निकृष्ट कामाचे धिंडवडे, रस्त्यावरिल खड्डे बनले डबक्यांचे अड्डे !!
उदगीर (एल.पी.उगीले) : शहरात नागरिकांच्या सुविधांचा विचार करून रस्ते, नाल्यांची सोय तत्कालीन आमदार चंद्रशेखर भोसले यांच्या काळात झाली होती. त्यानंतर या रस्त्यांच्या दुरुस्ती साठी वेळोवेळी निधी आला, मात्र राजकीय स्वार्थ साधण्यासाठी बगलबच्च्यांना रस्त्याच्या कामाचे तुकडे करून खैरात वाटण्यात आली. परिणामतः “एक ना धड, भाराभर चिंध्या” म्हणतात, त्याप्रमाणे एकही चांगला रस्ता बनला नाही. किंवा कामही चांगले झाले नाही. कार्यकर्ते खुश झाले, मात्र सर्वसामान्य जनता नाराज झाली आहे. थुक्का पॉलिसी करून केलेले थातूरमातूर, निकृष्ट दर्जाचे काम पावसामुळे उघडे पडले आहे. साधा मुरूम टाकून बुजवलेले खड्डे पुन्हा पूर्ववत निर्माण झाले आहेत. आणि या खड्ड्यामध्ये पाणी साचून डबके बनले आहेत. ज्या डबक्यातून चालणे विद्यार्थ्यांना त्रासदायक बनवू लागले आहे.
उदगीर शहरातील बिदर रोड परिसरा मध्ये अनेक नामांकित शाळा, महाविद्यालय आहेत. या शाळांसाठी म्हणून रस्ते बनवण्यात आले. मात्र आज त्या रस्त्यावरून चालत जाणे किंवा दुचाकी वर जाणे म्हणजे कसरत करत जाण्यासारखे झाले आहे.
बिदर रोड भागातील साईनगर, सावरकर चौक, शेल्हाळ रोड भाग तसेच उड्डाणपुलाच्या खालचा भाग या ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
विद्यार्थ्यांना आपल्या शाळा आणि शिकवणीसाठी शाळा किंवा शिकवणी वर्गापर्यंत सायकल घेऊन जाता येत नाही. पालकांनाही दुचाकी वर विद्यार्थ्यांना सोडावे म्हटले तर, सर्कस करत जावे लागते. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
उदगीर नगर परिषद, मादलापूर ग्रामपंचायत, निडेबन ग्रामपंचायत या भागात हे रस्ते येतात, मात्र कोणीही विद्यार्थ्यांची किंवा विद्यार्थ्यांच्या पालकांची होणारी गैरसोय विचारात घेत नाहीत. रस्त्याची दयनीय अवस्था बदलत नाही, उड्डाणपुलाच्या खालून जाणारा रस्ता तर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता? असे कोडे बनावे असाच झाला आहे.
या परिसरात असलेल्या रवींद्रनाथ टागोर विद्यालय तसेच हावगी स्वामी कॉलनी मधील विवेकानंद नगर, साईनगर, गोपाळ नगर या परिसरात असलेल्या विविध खाजगी शिकवण्या तसेच इंग्रजी माध्यमांच्या अनेक शाळा आहेत. त्यामुळे या भागातील रस्त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष न करता नागरिकांची आणि विद्यार्थ्यांची गैरसोय टाळावी, आणि पावसाळा सुरू झाला आहे, तसेच शाळा ही सुरू होऊ लागल्या आहेत. त्यामुळे तातडीने रस्ते दुरुस्त करावेत अशी मागणी पालकातून होत आहे.