मृगाच्या पहिल्याच पावसाने प्रशासनाची दानादान, नाल्या तुडुंब भरल्या, आडतीवरचा माल भिजला

0
मृगाच्या पहिल्याच पावसाने प्रशासनाची दानादान, नाल्या तुडुंब भरल्या, आडतीवरचा माल भिजला

मृगाच्या पहिल्याच पावसाने प्रशासनाची दानादान, नाल्या तुडुंब भरल्या, आडतीवरचा माल भिजला

उदगीर (एल पी उगिले) : उदगीर विधानसभा मतदारसंघात मृग नक्षत्राचा पाऊस जोरदार बरसला, त्यामुळे उदगीर शहरातील नाल्या तुडुंब भरल्याने घाण पाणी रस्त्यावर आले. उदगीर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय मार्गावर पावसाचे गुडघाभर पाणी साचल्याने, रहदारीला अडथळा निर्माण झाला होता. तर बिदर रोडवरील उड्डाण पुलाच्या खालून जाणाऱ्या रस्त्यावर जास्त पाणी साचल्याने, डबके साचल्यामुळे विद्यार्थी आणि दुचाकी चालकांना कसरत करत चालावे लागले.
पावसाच्या अचानक बरसल्याने अडत व्यापाऱ्यांचीही मोठी गोची झाली. आडती समोर ठेवलेला माल भिजला. त्यामुळे मोठे नुकसान झाले. मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यात प्रचंड उकाडा वाढल्यामुळे नागरिक हैरान होते. मृग नक्षत्र बरसल्याने हवेत गारठा निर्माण झाला आहे. मोठा पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. बी बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी बाजारात एकच गर्दी केली आहे.
उदगीर तालुक्यात सरासरी 440 मिमी इतका पाऊस झाला आहे. यामध्ये प्राधान्याने हेर महसूल मंडळात सर्वाधिक पाऊस झाला आहे. त्या पाठोपाठ उदगीर, मोघा, तोंडार, देवर्जन आणि नळगीर महसूल मंडळात पाऊस झाला. या पावसामुळे पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई टळली आहे. उदगीर विधानसभा मतदारसंघातील 13 प्रकल्पातील पाणीसाठा कोरडा ठाक पडल्यामुळे प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाई विचारात घेऊन नियोजन केले होते.

निडेबण, गुरधाळ, माळ हिप्परगा, माळहीपरगा, भोपनी, चांदेगाव, डोंगरगाव, पिंपरी, नागलगाव या पाणीसाठ्याच्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे. मात्र तिरु प्रकल्प, सोनाळा, हळद वाढवणा, जंगमवाडी, केकत सिंदगी, ढोर सांगवी चेरा, हावरगा, करखेली, आरसनाळ, बामाजीचीवाडी, केसगरवाडी, कल्लूर या 13 प्रकल्पाचा पाणीसाठा शून्य झाला होता. या कोरड्या ठाक पाणीसाठ्याने विधानसभा मतदारसंघात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर केला होता. मात्र या पावसामुळे प्रशासनाने समाधानाचा सुस्कारा सोडला आहे.
उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात पाऊस येईल याची खात्री नसल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी आडतीवरचा माल बाहेर ठेवला होता, तो भिजल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वादळ आणि विजासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले आहे. मात्र या नुकसानेकडे न पाहता पेरणीची तयारी करण्यामध्ये शेतकरी मशगुल झाले आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *