स्व. लक्ष्मीकांत हलकीकर यांनी तत्त्वाशी कधीही तडजोड केली नाही – भारत सातपुते
उदगीरात बस्वराज पैके यांना स्व. हलकीकर स्मृती पुरस्कार प्रदान
उदगीर (प्रतिनिधी) : चाळीस वर्षांपूर्वी निलंगा सारख्या ग्रामीण भागात पत्रकारिता करत असताना ज्येष्ठ पत्रकार स्व. लक्ष्मीकांत हलकीकर यांनी कधीही तत्त्वाशी तडजोड केली नाही. मूल्य निष्ठा सांभाळून पत्रकारिता करीत असताना त्यांनी सामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे मत प्रसिद्ध वात्रटिकाकार भारत सातपुते यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ पत्रकार स्व. लक्ष्मीकांत हलकीकर स्मृती सेवागौरव पुरस्काराने उदगीर येथील श्री शंकरलिंग महाराज मठात आयोजित कार्यक्रमात लातूर येथील समाजसेवक बस्वराज पैके यांना ज्येष्ठ साहित्यिक तथा वात्रटिकाकार भारत सातपुते यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे होते. व्यासपीठावर पुरस्कार प्राप्त बसवराज पैके, माजी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. आर. एन. लखोटीया, खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत चामले, दक्षिण मध्य रेल्वे बोर्डाचे सल्लागार समिती सदस्य मोतीलाल डोईजोडे, संयोजक विशाल हलकीकर, विक्रम हलकीकर यांची उपस्थिती होती.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विक्रम हलकीकर यांनी केले.
यावेळी बोलताना भारत सातपुते यांनी प्रत्येकाने आपण ज्या क्षेत्रात काम करीत आहोत त्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम केले पाहिजे तरच स्वराज्याचे रूपांतर सुराज्यात होणार असल्याचे सांगितले. स्व. लक्ष्मीकांत हलकीकर यांनी त्या काळात आजच्या सारखी डिजिटल पत्रकारिता नसतानाही समाजाच्या कल्याणासाठी पत्रकार म्हणून मोलाची भूमिका बजावली असल्याचे सांगत त्यानीच समाजातील चांगल्या लोकांच्या पाठीशी राहण्याचे काम केले असल्याचे सांगितले. बस्वराज पैके हे स्वतः दिव्यांग असताना आपल्याला जे हाल सोसावे लागत आहेत ते इतर दिव्यांगाच्या नशिबी येऊ नयेत म्हणून ज्या पद्धतीने काम करीत आहेत ते इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे मतही यावेळी सातपुते यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोपात राहुल केंद्रे यांनी आपल्या राजकीय वाटचालीत पत्रकारांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले. स्व. लक्ष्मीकांत हलकीकर यांनी समाजाचे कल्याण करण्याचा हेतू समोर ठेवून पत्रकारिता केली असल्याचे सांगून बस्वराज पैके यांच्या कार्याचाही त्यांनी गौरव केला. कोरोना काळात पैके यांनी केलेले कार्य मोठे उल्लेखनीय असल्याचे केंद्रे म्हणाले. जिल्हा परिषदेचा अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत आपण दिव्यांगाच्या विकासासाठी केलेल्या कामाचा आलेखही यावेळी राहुल केंद्रे यांनी मांडला.
पुरस्काराला उत्तर देताना बस्वराज पैके यांनी आपण भोगत असलेला त्रास इतरांना होऊ नये म्हणून मी दिव्यांगाच्या क्षेत्रात काम करीत आहे, आज उदगीर मध्ये मिळालेला पुरस्कार आपल्याला पुढील कामासाठी अधिक ऊर्जा देणारा असल्याचे मतही यावेळी पैके यांनी व्यक्त केले.
यावेळी शहरातील विविध सामाजिक संस्थेचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यात जिव्हाळा ग्रुप, श्री नवयुवक व्यापारी गणेश मंडळ, श्रीमंत व्यापारी गणेश मंडळ, चला कवितेच्या बनात, पर्यावरण शिक्षण केंद्र एकुरका रोड, साहित्यिक सखी ग्रुप उदगीर, संस्कार भारती शाखा उदगीर, सायकलिंग ग्रुप उदगीर, जिवलग फाउंडेशन निलंगा, स्वराज सेवाभावी संस्था निलंगा, राधाकृष्ण फाउंडेशन निलंगा या सामाजिक संस्थांचा व गोमातेची सेवा करणारे मोहमद इसाक, बॅडमिंटन खेळात देशपातळीवर उदगीर चे नावलौकिक वाढविणारा नागेश भरत चामले, दिल्ली येथे पार पडलेल्या छात्र संसदेत आपली छाप पाडणारी उदगिरची लेक प्राजक्ता भांगे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते बस्वराज पैके यांना शाल, स्मृतिचिन्ह, मानपत्र व रोख पाच हजार रुपये देऊन स्व. लक्ष्मीकांत हलकीकर स्मृती सेवागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मानपत्राचे वाचन अनुराधा धोंड यांनी केले. सूत्रसंचालन अश्विनी देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन विक्रम हलकीकर यांनी मानले. या कार्यक्रमास सामाजिक, राजकीय, साहित्य, शिक्षण, सांस्कृतिक, पत्रकार अशा विविध क्षेत्रातील मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.