स्वावलंबनाचे धडे देणारे शिक्षण ही काळाची गरज – निवृत्ती सांगवे
उदगीर (एल.पी.उगीले) : व्यवसायभिमुख शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवणे ही काळाची गरज बनली आहे. सध्या सुशिक्षित बेकारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. त्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध नाहीत. परिणामतः समाजामध्ये बेकारी वाढत चालले आहे. बेकारी मुळे समाजामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये उदासीनता निर्माण होऊ लागली आहे. यावर उपाय म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षणातून उदरनिर्वाहाचा मार्ग शोधता यावा, अशा पद्धतीचे व्यवसायाभिमुख शिक्षण दिले जावे. असे विचार राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष तथा भारतीय दलित पॅंथरचे प्रदेश उपाध्यक्ष निवृत्तीराव सांगवे यांनी व्यक्त केले.
ते मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था द्वारा संचलित नारायणा कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन उदगीर येथे यशस्वी विद्यार्थिनींना शिलाई मशीनचे वाटप, ड्रेस डिझाईनचे भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन तथा पारितोषक वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष राम गायकवाड हे होते. तर इतर प्रमुख पाहुण्यांमध्ये परभणी येथील नालंदा फाउंडेशनचे प्रदीप रोडे, परभणी येथील प्राचार्य शामसुंदर वाघमारे, पूर्णा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य केशव जोंधळे, आर.डी. जोगदंड यांच्यासह प्राचार्य रोडगे एस एन, प्राचार्य राजे डी. व्ही., प्राचार्य माधव मांजीवाळे, प्राचार्य आर. एम. हरकांचे, प्राचार्य बी. एस. कांबळे, प्राचार्य नवनाथ खुळे, प्राचार्य सतीश शेंडगे, प्राचार्य आर. एन. भालके, उमाकांत गुनाले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी संस्थेच्या वतीने 125 विद्यार्थिनींना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. तसेच गेल्या वर्षीच्या विद्यार्थिनींना 75 शिलाई मशीनचे वाटप संस्थेच्या वतीने राम गायकवाड यांनी केले. तर या महाविद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थिनींना गुणाानुक्रमे यादीत आलेल्या सर्व विद्यार्थिनींना राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या वतीने पारितोषक निवृत्तीराव सांगवे यांच्या वतीने देण्यात आले.
पुढे बोलताना निवृत्तीराव सांगवे म्हणाले की, विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्याचे शिक्षण देतानाच, त्यांना स्वावलंबनाचा आधार देणे गरजेचे आहे. या उदात्त हेतूने संस्थेने शिलाई मशीनचे वाटप करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. समाजामध्ये महिलांच्या शिक्षणाला खूप महत्त्व आहे. कारण एक पुरुष शिकला तर तो एकटाच शिक्षित होतो, मात्र एक महिला जर शिकली तर एक कुटुंब सुशिक्षित होते. त्यासोबतच सुसंस्काराची ही पेरणी कुटुंबामध्ये होत असते. या पार्श्वभूमीवर नारायणा कॉलेज ऑफ फॅशन डिझाईनचे निकालही उत्कृष्ट आहेत. त्यासोबतच विद्यार्थ्यांनी आजपर्यंत केलेली प्रगती ही महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवणारीच आहे.
याप्रसंगी प्राचार्य प्रदीप रोडे, प्राचार्य वाघमारे, प्राचार्य केशव जोंधळे यांनीही समयोचित विचार मांडले.
अध्यक्षीय समारोप करताना राम गायकवाड यांनी सांगितले की, या महाविद्यालयातून शिक्षण घेऊन पुढे जाणाऱ्या विद्यार्थिनी जीवनात यशस्वीच होतील. केवळ उपजीविकेचे साधनच नाही तर जीवनात जगत असताना येणाऱ्या संघर्षावर मात कशी करावी, याचेही धडे महाविद्यालयांमध्ये दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.