छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन बांधकाम करण्यासाठी १२ कोटी रुपयाचा निधी मंजूर ना. बनसोडे यांची माहिती
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर शहरातील नागरिकांची मागणी लक्षात घेवुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने उभारण्यात येत असलेल्या ‘ छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवनासाठी’ राज्य शासनाच्या नगर विकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत वाढीव १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी या सांस्कृतिक भवनासाठी ९ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता. आता यामध्ये आणखी १२ कोटी रूपयाचा निधी वाढवण्यात आला असुन एकुण २१ कोटी रुपयाचा निधी छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवनासाठी मंजूर केला असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी दिली.
उदगीर शहर हे एक सांस्कृतिक शहर म्हणून नावारूपाला येत आहे. तीन राज्याच्या सीमेवर असलेल्या या शहराला एक सांस्कृतिक ओळख देण्यासाठी या भागाचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे हे परिश्रम घेत आहेत. मागील काळात उदगीर शहरांमध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन, मराठी बाणा, चला हावा येऊ द्या फेम हास्यकल्लोळ कार्यक्रम, जगप्रसिध्द गायक अजय – अतुल व अवधूत गुप्ते यांच्या संगीत मैफिलीसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी उदगीर शहराला सांस्कृतिक शहर म्हणून महाराष्ट्रात नावारुपाला आणले आहे.
या भागातील नागरिकांना सांस्कृतिक मेजवानी मिळावी यासाठी सुसज्ज अत्याधुनिक पद्धतीच्या सांस्कृतिक भवनाची गरज लक्षात घेऊन क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी उदगीर शहरात नाट्यगृहाची उभारणी सुरू केली आहे. आपल्या परिसरातील नागरिकांना सर्व सुविधायुक्त नाट्यगृह उपलब्ध व्हावे व या भागातील रसिकांना सांस्कृतिक मेजवानी मिळावी म्हणून राज्य शासनाकडून 12 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेऊन उदगीरकरांचे व या भागातील कलावंतांचे स्वप्न क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी पूर्ण केल्याने कलावंत, रसिक व सांस्कृतिक प्रेमी नागरिकांनी ना. संजय बनसोडे यांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले आहेत.