आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्या संदर्भात बैठक संपन्न
उदगीर (एल. पी. उगिले) : “करो योग, रहो निरोग” या तत्त्वानुसार समाजामध्ये योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी तथा विद्यार्थ्यांना योगासने शिकवण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात 21 जून रोजी सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. समाजातील सर्वांनी निरोगी राहण्यासाठी आवश्यक असलेल्या आणि सहज साध्य होतील, अशा योगासनांची माहिती विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना देण्याच्या उद्देशाने शासकीय पातळीवरून आणि पतंजली योग समितीच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पतंजली योग समिती उदगीर आणि तालुका प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये सुशांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. याप्रसंगी नगरपालिकेचे मुख्यअधिकारी सुंदर बोंदर, पतंजली योग समितीचे धनराज बिरादार, उमाकांत आंबेसंगे, सुरेंद्र अक्कलगिरे, श्रीराम चामले, सौ मीनाक्षी स्वामी, सौ सुमती भातंबरे इत्यादी प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. उदगीर शहरातील नागरिकांसाठी सामुदायिकरित्या जिल्हा परिषदेच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करावा. जर पाऊस आला तर राधे कृष्ण मंगल कार्यालय, देगलूर रोड उदगीर येथे कार्यक्रम घेण्यात यावा. असे प्रशासनाच्या वतीने सुचित करण्यात आले. तसेच ग्रामीण व शहरी भागातील शिक्षकांना पतंजली योग समितीच्या वतीने योग प्रशिक्षण देण्यात यावे. हे प्रशिक्षण 18 व 19 जून या तारखेला घेण्याचे निश्चित करण्यात आले. दोन हजार नागरिक व विद्यार्थी योगा करण्यासाठी उपस्थित राहू शकतील, त्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. तसेच आंतरराष्ट्रीय योग दिनाची माहिती नागरिकांना व्हावी म्हणून दर्शनी भागात योग दिनाचे बॅनर लावण्यात यावे. अशाही सूचना पतंजली योग समिती व तालुका प्रशासनाच्या वतीने अनेक मान्यवरांनी केल्या. या संदर्भात पुन्हा पुन्हा बैठका घेण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीला महत्त्व द्यावे, आणि प्रशिक्षणासाठी इच्छुक शिक्षकांशी संपर्क साधावा. अशा सूचना उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांनी याप्रसंगी केल्या.