विद्यार्थ्यांनी सामाजिक संशोधनाला अग्रक्रम द्यावा – प्राचार्य डॉ. हरिदास राठोड

विद्यार्थ्यांनी सामाजिक संशोधनाला अग्रक्रम द्यावा - प्राचार्य डॉ. हरिदास राठोड
अहमदपूर (गोविंद काळे) : महाविद्यालयीन विद्यार्थी हा समाज व्यवस्थेचा कणा असतो. समाजात वेळोवेळी निर्माण होणाऱ्या समस्यांचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. त्यासाठी केल्या जाणाऱ्या सर्वेक्षण आणि सामाजिक संशोधनाला अग्रक्रम देत पुढे यावे, असे आवाहन वसंतनगर ता. मुखेड येथील ग्रामीण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिदास राठोड यांनी केले.
डॉ. राठोड हे येथील महात्मा फुले महाविद्यालयात सामाजिक शास्त्रे अभ्यास मंडळ उद्घाटन व भित्तीपत्रकांच्या प्रकाशन समारंभात प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सम्राट अशोक मित्रमंडळाचे अध्यक्ष, माजी नगरसेवक डॉ. सिद्धार्थ सूर्यवंशी, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना प्राचार्य डॉ. राठोड म्हणाले की, चांगले विद्यार्थी घडविणे म्हणजे देशाचे सक्षम नागरिक घडविणे होय. विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीव जागृत ठेवून समाजाप्रतीचे ऋण फेडण्यासाठी पुढे आले पाहिजे, असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, सामाजिक शास्त्रे ही जगात सर्वत्र अभ्यासली जाणारी ज्ञान शाखा असून, सामाजिक शास्त्रे अभ्यास मंडळ म्हणजे समाजशास्त्रज्ञ घडविणारी कार्यशाळा होय. भित्तीपत्रकांच्या माध्यमातून विचारवंत, लेखक, कार्यकर्ते तयार होतात, असेही ते म्हणाले. यावेळी एम.ए. लोकप्रशासन या वर्गात विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, भूगोल, क्रीडा आणि तत्त्वज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तिपत्रकांचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रकाश चौकटे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सचिन गर्जे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. सतीश ससाणे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.