सहा सप्टेंबर रोजी शेतकरी न्याय मोर्चाचे आयोजन

सहा सप्टेंबर रोजी शेतकरी न्याय मोर्चाचे आयोजनसहा सप्टेंबर रोजी शेतकरी न्याय मोर्चाचे आयोजन
उदगीर (प्रतिनिधी) : तालुक्यातील शेतकऱ्यांना अत्यल्प पीक विमा मिळाला आहे. शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा मिळावा. या प्रमुख मागणीसह ईपीक पाहणी नोंदी बंद कराव्यात आणि शेतमाल योग्य भाव मिळावा. या मागण्यासाठी उदगीर तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन संघटनेच्या वतीने उदगीर येथे शेतकरी न्याय मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाला अधिकृत परवानगी द्यावी. अशा पद्धतीची मागणी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन संघटनेने पोलीस प्रशासनाकडे केली आहे. याप्रसंगी चेअरमन विवेक पंडितराव जाधव, कोणमारे मनमत, अभंग जाधव, वैजनाथ केसगिरे, बाळासाहेब जाधव, दयानंद रोडगे, शिवा पाटील इत्यादी प्रमुख चेअरमन उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने उदगीर आणि जळकोट तालुक्यावर अन्याय करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना पिक विमा देताना सापत्नभावाची वागणूक दिली गेली आहे. लातूर जिल्ह्यातील इतर तालुक्यांना मुबलक प्रमाणात विमा वाटप करण्यात आला आहे, मात्र उदगीर आणि जळकोट तालुक्यावर झालेला शेतकऱ्यावरील हा अन्याय दूर झाला पाहिजे, आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. अशा पद्धतीची प्राधान्यक्रमाची मागणी चेअरमन संघटनेने प्रशासनाकडे यापूर्वीही केली होती. मात्र त्या त्या वेळी आंदोलनासाठी वेगवेगळ्या कारणाने प्रतिबंध लावण्यात आले होते. त्यामुळे हे प्रलंबित राहिलेले आंदोलन 6 सप्टेंबर 2024 रोजी चेअरमन संघटनेच्या वतीने करण्यात येणार असून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मोर्चाच्या स्वरूपात चेअरमन संघटना आणि शेतकरी जातील. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सभेमध्ये हा मोर्चा विसर्जित होईल. असे चेअरमन संघटनेचे प्रवक्ते विवेक पंडितराव जाधव यांनी सांगितले आहे.