“मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा – टप्पा २” अभियानात क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूल तालुक्यात प्रथम
अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र शासनाच्या “मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा टप्पा २” अभियानात क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवला आहे. एकूण तीन लाखांचे पारितोषिक शाळेने मिळवले आहे. या यशामुळे तालुक्याच्या शिरपेचात पुन्हा एक मानाचा तुरा शाळेच्या यशाने रोवला गेला आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागांतर्गत शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान राबवण्यात आले होते. तालुक्यात जवळपास शेकडो विद्यालय व महाविद्यालयांचा यामध्ये सहभाग होता. विद्यालयाने विद्यार्थ्यांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबवले. घेतल्याने विद्यालयास तालुक्यातून प्रथम क्रमांकाचे तीन लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले. याबद्दल गटविकास अधिकारी अमोल आंदेलवाड, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे, केंद्र प्रमूख नामदेव केंद्रे यांनी संस्थेचे कौतुक केले.
विद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष जीवनकुमार मद्देवाड, सीईओ रितू मद्देवाड यांनी प्राचार्य जेबाबेरला नादार यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकांचे अभिनंदन केले. प्राचार्य जेबाबेरला नादार, शाळा समन्वयक संगमेश्वर ढगे, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आदींनी उपक्रमासाठी परिश्रम घेतले. पालक वर्गातून तसेच अनेक स्तरातून शाळेचे कौतुक केले जात आहे.
या उपक्रमांची घेतली दखल भौतिक सुविधा व डिजिटल वर्गखोल्या, प्रोजेक्टरची उपलब्धता, क्रीडा विभागाचा उत्कृष्ठ निकाल, शाळा व वर्ग सजावट, भिंतीची रंगरंगोटी, वृक्षारोपण, विद्यार्थी मंत्रिमंडळ, परसबाग निर्मिती, ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रम, नवभारत साक्षरता अभियान, शैक्षणिक स्पर्धा, आरोग्य तपासणी, समुपदेशन सत्रांचे आयोजन, स्वच्छता अभियान, प्रिंटरची उपलब्धता, भव्य कॉम्पुटर लॅब, विज्ञान प्रयोगशाळा, उत्क्रष्ठ भाषा व गणित विभाग, महावाचन चळवळ.