विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिल्यास प्रेरणा मिळते – उषाताई कांबळे
उदगीर (प्रतिनिधी) : गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या कामाचे कौतुक करून, त्यांना बक्षीस दिल्यास त्यांचा उत्साह द्विगुणीत होतो. आणि आपण करत असलेल्या कामांमध्ये गतिमान व्हावे, अशी प्रेरणा त्यांना मिळते. असे विचार काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष उषाताई कांबळे यांनी व्यक्त केले.
त्या हाळी हंडरगुळी येथील शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या खेळाडूंच्या पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना खेळाच्या ड्रेसचे किट देऊन तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना खेळामध्ये विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल रोख रक्कम बक्षीस म्हणून देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष कल्याण पाटील, काँग्रेसचे कार्यकर्ते अमजद पठाण, गौतम सोनकांबळे, प्रदीप उदगीरकर व शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी ग्रामीण भागातील खेळाडू मोठ्या जिद्दीने खेळतात. त्यांना योग्य मार्गदर्शन आणि सरावाची तयारी करून घेणे गरजेचे असते. असे विचार कल्याण पाटील यांनी व्यक्त केले.