ग्रामीण भागात रस्त्याची चाळण झाली असून दुरुस्ती कधी होणार, प्रवाशांची गोची
उदगीर (प्रतिनिधी) : विधानसभा मतदारसंघात ग्रामीण भागामध्ये नुकत्याच झालेल्या अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. अगोदरच तकलादू आणि निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाला मोठमोठ्या झालेल्या पावसामुळे आणि त्याच्यानंतर सतत छोट्या मोठ्या पावसामुळे उदगीर तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. या संदर्भात नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने अहवाल तयार केल्याचे समजते. मात्र या अहवालात पावसाळ्यात वाहून किंवा खराब झालेल्या रस्त्यांची, पुलांची दुरुस्ती कधी होणार? हे अद्याप अस्पष्ट आहेत. मध्ये मध्ये तात्पुरत्या दुरुस्त्या करून मलमपट्टी करण्याचे काम झाले मात्र तेही एखाद दुसऱ्या पावसात पुन्हा उखडले गेले. विधानसभा मतदारसंघात भरमसाठ निधी आला असला तरी अत्यंत तकलादू, निकृष्ट दर्जाचे कामे झाले असल्याचा आरोप राजकारणी करत आहेत. आता या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पुन्हा निधी उपलब्ध करून दिला जावा, अशी मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे बोगस रस्ते करणाऱ्या कंत्राटदाराचे चांगभले असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. अगदी एक वर्षाच्या आतच कित्येक रस्ते उखडून गेले आहेत. त्यामुळे त्या रस्त्यांची दुरुस्ती संबंधित कंत्राटदाराकडूनच केली जावी, किंबहुना त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली होती तसेच इतरही काही संघटनांनी आग्रह धरला आहे. आता विधानसभा निवडणुका चा बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकतो. त्यामुळे आता या रस्त्याच्या प्रश्नाकडे कोणी गांभीर्याने पाहिल की नाही? हे सांगता येत नाही. शिवाय काही महिन्यापूर्वीच दिलेले कोट्यावधी रुपयांचा निधी अशा पद्धतीने खड्ड्यात गेला आणि गुत्तेदारांच्या खिशात गेला ही बाब जनता विसरू शकणार नाही. त्याचे दूरगामी परिणाम निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेवर होऊ शकतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण ग्रामीण भागातील रस्त्याचा त्रास हा ग्रामीण जनतेला मोठ्या प्रमाणात होतो आहे. शहरी भागातील रस्ते नादुरुस्त झाल्यास किंवा खड्डे पडल्यास तात्काळ तीव्र आंदोलन करून रस्ते दुरुस्त करून घेतले जातात, परंतु स्थानिक स्वराज्य संस्था सध्या अस्तित्वात नसल्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांचे प्रश्न मांडावेतरी कोणाकडे? असा प्रश्न जनतेला पडला आहे. लोकप्रतिनिधी नव्या नव्या रस्त्याच्या उद्घाटनाचे नारळ फोडण्यात मग्न आहेत. मात्र परवा झालेल्या रस्त्याची अशी दुर्दशा झाली हे पाहण्याकडे कोणाचा कल दिसून येत नाही. रस्त्याची झालेली अशी दुर्दशा छोट्या-मोठ्या अपघाताला निमंत्रण देत आहे. त्यामुळे प्रशासनाने जातीने लक्ष घालून ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्त करावेत, अशी मागणी केली जात आहे. अगदी सहा महिन्यापूर्वी झालेल्या एका रस्त्याची पाहणी माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी शिष्टमंडळासह केली असून तो रस्ता उघडला गेला असल्यामुळे अशा कामाची चौकशी केली जावी अशा पद्धतीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले असल्याचे समजते. मात्र आता सर्वजण निवडणुकीच्या रणधुमाळीत व्यस्त राहतील आणि प्रश्न आहे तिथेच राहतील. असे चित्र असून लोक स्पष्टपणे बोगस आणि निकृष्ट कामाबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत.