कामगार अधिकारी कार्यालय सुरू करा, विविध संघटनांची मागणी
उदगीर (एल.पी.उगीले) उदगीर शहर हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. शिवाय महाराष्ट्र, कर्नाटका, आंध्रा, तेलंगणा या चार राज्याच्या सीमेवर असल्यामुळे मोठी बाजारपेठही निर्माण झाली आहे. या शहरांमध्ये छोटे-मोठे उद्योगधंदे बऱ्यापैकी चालतात. त्यामुळे कामगारांची संख्या लक्षणीय आहे. मात्र या कामगारांना छोट्या छोट्या कामासाठी लातूर शहराला जावे लागते. कामगारांची होणारी ही हेळसांड थांबावी, यासाठी उदगीर येथे कामगार अधिकारी कार्यालय सुरू करावे. अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे.
तालुक्यातील कामगार आणि व्यापाऱ्यांना त्यांच्या कामासाठी सहाय्यक कामगार आयुक्तालय कार्यालय लातूर येथे जाणे परवडत नाही. त्यामुळे उदगीर येथील बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात कामगार म्हणून नोंदणी व नूतनीकरण या कामाची सुविधा उपलब्ध व्हावी कारण सध्या या कामासाठी लातूरला जावे लागते. नोंदणी, नूतन करण्यासाठी तालुकास्तरावर सुविधा केंद्रासाठी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने आदेश काढले आहेत, उदगीर मध्ये कामगार अधिकारी कार्यालय स्थापन करून कामगार अधिकाऱ्यांची तात्काळ नियुक्ती करावी, अशी मागणी दक्ष कामगार संघटना, शेतकरी व बांधकाम मजूर संघटना, जन परिवर्तन सेवा संघ, बहुजन विकास अभियान, महाराष्ट्र संघर्ष अभियान इत्यादी संघटनांच्या वतीने राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्याकडे मागणी केली आहे.