बालिकांच्या न्याय हक्कांसाठी सामाजिक संघटनांनी पुढे आले पाहिजे – प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील
अहमदपूर (गोविंद काळे) : स्त्री – पुरुष विषमता ही समस्या दिवसेंदिवस उग्र स्वरूप धारण करीत असून, लिंगभेदाच्या कारणांवरून बालिकांवर अत्याचार होण्याचे प्रमाण भयंकर वाढले आहे. त्यामुळे केवळ सरकारवर अवलंबून न राहता बालिकांच्या न्याय हक्कांसाठी सामाजिक संघटनांनी पुढे आले पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक तथा महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केले.
येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की जन्माच्या आधीपासूनच बालिकांच्या जगण्याला ग्रहण लागते. मुलाच्या जन्माचे स्वागत पेढे वाटून तर मुलीच्या जन्माचे स्वागत जिलेबी वाटून केले जाते, हा भेदभाव आता नष्ट झाला पाहिजे. प्रत्येक मुलीला योग्य शिक्षण मिळाले पाहिजे. स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळाली पाहिजे. मुलगा हाच वंशाचा दिवा ही संकल्पना आता बाद झाली असून समाजाने मुलगा- मुलगी असा भेदभाव न करता आपल्या पाल्यांना समदृष्टीने वाढविले पाहिजे, तरच आपल्या समाजाचा खऱ्या अर्थाने विकास होईल असेही ते यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले. सूत्रसंचालन संस्कृत विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत बिरादार यांनी केले, तर आभार डॉ. सतीश ससाणे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.