खुनाच्या गुन्ह्यातून पॅराल वर आलेल्या आरोपीकडून पत्नीचा खून, पती फरार
उदगीर (एल पी उगिले): उदगीर येथील एका खुनाच्या गुन्ह्यामध्ये जेल भोगलेला आणि सध्या पॅरोलवर सुटलेल्या आरोपीने आपल्या पत्नीला कोर्टामध्ये अपिलासाठी माहेरहून पैसे आण, म्हणून तगादा लावला होता. मात्र आपण आणखी पैसे मागू शकत नाही, असे पत्नीने म्हणताच बंदुकीच्या गोळ्या घालून तिचा खून केल्याची तक्रार चंद्रकांत विनायक गव्हाणे यांनी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दिल्यावरून आरोपी सोनू उर्फ अमित नाटकरे याच्या विरुद्ध कलम 103 (1), 351 (2) भारतीय न्याय संहिता 2023 सह कलम 3/ 25 शस्त्र अधिनियम 1959 प्रमाणे गु.र.न. 564 /24 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या संदर्भात पोलीस सूत्राकडून हाती आलेली माहिती अशी की, यातील आरोपी सोनू उर्फ अमित नाटकरे याने त्याची पत्नी भाग्यश्री सोनू उर्फ अमित नाटकरे ही माहेरून पैसे आणत नाही, म्हणून मनात राग धरून तिला बंदुकीतील गोळ्या घालून जीवानिशी ठार मारून खून केला आहे. या संदर्भात पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती केंद्रे या करत आहेत. आरोपी फरार आहे. त्याचा शोध गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक भिसे, पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष उर्फ नाना शिंदे, राजू घोरपडे, नामदेव चेवले, राम बनसोडे यांच्यासह उदगीर ग्रामीण पोलीस घेत आहेत.