कृषि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा ग्लोबल विकास ट्रस्ट, शेतकरी प्रशिक्षण केंद्र, सिरसाळा (परळी) येथे अभ्यास दौरा संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा, उदगीर येथील २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांमध्ये बी.एस.सी. (मानद) कृषी पदवी अभ्यासक्रमात प्रवेशित पहिल्या सत्रातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अभ्यास दौरा सिरसाळा (परळी ) येथील ग्लोबल विकास ट्रस्ट, शेतकरी प्रशिक्षण केंद्र येथे आयोजित करण्यात आला होता. नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना कृषि सलंग्न विविध कार्य प्रणाली, शेती मधील प्रगत तंत्रज्ञान, विविध फळबाग लागवड तंत्रज्ञान व पाणलोट विकासातील कार्य यांचे ज्ञान मिळवण्यासाठी या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
सुरुवातीस ग्लोबल विकास ट्रस्ट, (शेतकरी प्रशिक्षण केंद्र) येथील कर्मचाऱ्यांनी गंगाधररावजी दापेकर , डॉ. आनंद दपकेकर यांच्यासह उपस्थित कृषी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे स्वागत करून संस्थेच्या कार्याची माहिती दिली. दिवसाभरातील दिनचर्या सांगितली. प्रथम सत्रात ग्लोबल विकास ट्र्स्ट चे प्रमुख प्रशिक्षक लहू राठोड व त्यांच्या चमूने येथील २४ एकर प्रक्षेत्रावर सुधारित पद्धतीने लागवड करण्यात आलेल्या विविध फाळझाडांच्या बागेस प्रत्यक्ष भेटून विस्तृत माहिती दिली, या मध्ये आंबा, लिंबू, संत्रा, मोसंबी, केळी, डाळिंब, पेरू, पपई , सिताफळ व जांभूळ इत्यादी, तसेच नक्षत्र उद्यानात, औषधी वनस्पती उद्यान, बांबू ऑक्सिजन उद्यान, जैविक खत प्रकल्प,बायोगॅस प्रकल्प, गोशाळा व रेशीम उत्पादन तंत्रज्ञान प्रकल्पास भेटून संदर्भातल्या उद्योगाच्या संधी व अडचणी विषयी सखोल माहिती देण्यात आली.
द्वितीय सत्रामध्ये पाणलोट विकास प्रकल्प व ग्लोबल विकास संस्थेची जलसंवर्धनाविषयी कार्य व प्रात्यक्षिके माहिती दालन,माती परीक्षण प्रयोगशाळा, विविध रोग व किडी संदर्भात माहिती दालन , विविध कृषी अवजारे प्रदर्शनी, शेतीविषयक नवतंत्रज्ञान माहिती दालन, शेतकऱ्यासाठी औषधी विक्री दालन इत्यादी विषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
तसेच अभ्यास दौरा समारोह व चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे प्रमुख मयंक गांधी, रामदेव अग्रवाल व डॉ. हरिश्चंद्र वंगे, संस्थेचे प्रशिक्षक व कर्मचारी आणि कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक यांच्या मध्ये पारंपरिक पिकामध्ये फेरबदल, शेती मधील नवीन तंत्रज्ञान व शेतकऱ्यांच्या अडचणी अशा कृषिविषयक विविध मुद्द्यावर चर्चा केली. याप्रसंगी रामदेव अग्रवाल म्हणाले, की मयंक गांधी यांच्या नेतृत्वाखाली ग्लोबल विकास ट्रस्ट ग्रामीण समुदायांमध्ये खरा बदल घडवून आणत आहे. त्यांच्या कार्यामुळे असंख्य शेतकऱ्यांना सक्षम केले आहे, आणि दहा पटीने उल्लेखनीय प्रगती झाली आहे. तसेच मयंक गांधी यांनी सांगितले की, ही संस्था शेतकऱ्यांसाठी तळमळीने काम करत आहे. शेतकऱ्यांचा आत्महत्यामुक्ती कडे प्रवास करत असताना बळीराजाच्या उत्पन्नात चार पट वाढ करण्याचा संस्थेचा उद्देश आहे. हे काम फक्त परळीपुरते मर्यादित न ठेवता अशा हजारो शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. गंगाधरजी दापकेकर यांनी ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी राबविलेले विविध कार्यक्रमा विषयी माहिती दिली. कृषी संस्थेची उभारणी करून ग्रामीण भागातील विद्यार्थी व शेतकऱ्यासाठी अविरत काम करत असल्याचे सांगितले.ग्लोबल विकास संस्थेच्या कार्याचे कौतुक केले व आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
शैक्षणिक अभ्यास दौरा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी कृषि महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा, उदगीरचे प्राचार्य डॉ. ए. पी. सूर्यवंशी, उप-प्राचार्य डॉ. ए. एम. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. आनंद दापकेकर, डॉ. शिवशंकर वानोळे, डॉ. दीपक पानपाट्टे,डॉ. शिवाजी माने,डॉ.गोविंद हमाने,डॉ. वसीम शेख, प्रा. सचिन खंडागळे, प्रा स्नेहा मुन व प्रो. सौ.भाग्यश्री निडवंचे यांनी अथक परिश्रम घेतले.