वाचनाने सृजनशीलता वाढते – प्रा. श्रीहरी वेदपाठक
उदगीर (प्रतिनिधी) : वाचनाने विचारास दिशा मिळून सृजनशीलता वाढते. विचारातून ज्ञान निर्माण होते. ज्ञानापासून महानता येते म्हणून मानवी जीवनात वाचनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे मत सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. श्रीहरी वेदपाठक यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.आर.के.मस्के होते. यावेळी मंचावर उपप्राचार्य डॉ.एस.जी.पाटील, प्रा.सी.एम.भद्रे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना प्रा.वेदपाठक म्हणाले, वाचन मनुष्याला बहुश्रुत करते. वाचन बहुमूल्य सवय असून वाचनाने रचनात्मकता, सकारात्मकता येते. विचाराच्या कक्षा रुंदावतात. त्यामुळे वाचनातून व्यक्तिमत्व विकास घडवावा, असे आवाहन उपस्थितांना केले. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ.राजकुमार मस्के म्हणाले, वाचन, मनन, लेखन, चिंतन ही शिक्षण क्षेत्रातील अव्याहत चालणारी प्रक्रिया आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अभ्यासक्रमापलीकडे जाऊन वाचनाची गोडी निर्माण करणारे आहे, असे मत व्यक्त केले. सुरुवातीस डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच पांढरी काठी दिन म्हणून दिव्यांग विद्यार्थ्यांचे प्राचार्य व प्राध्यापकांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.गौरव जेवळीकर यांनी तर आभार प्रा.डॉ. बी.एस.होते यांनी मानले.