काँग्रेस आणि भाजपच्या आक्रमक भूमिकेमुळे दोन्ही राष्ट्रवादी अडचणीत
उदगीर (एल. पी. उगीले) : उदगीर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष आपल्याच पक्षाला जागा सुटावी, यासाठी हट्टाला पेटले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या समोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
उदगीर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आ. संजय बनसोडे हे राष्ट्रवादीकडून विजयी झाले होते, मात्र त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फुटाफूट झाल्यानंतर अजित पवार गटात जाऊन कॅबिनेट मंत्रीपद मिळवले. त्यामुळे या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा दावा असल्याचे पारंपारिक पद्धतीच्या नियमानुसार सांगितले जात आहे. मात्र या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटापेक्षा काँग्रेस पक्षाची ताकद जास्त आहे. गेल्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला असला तरी तो काँग्रेस पक्षाच्या बळावरच विजयी झाला. त्यामुळे यावेळेस ही जागा काँग्रेस पक्षाला दिली जावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी करत आहेत. त्याच पद्धतीने भारतीय जनता पक्षाकडून महायुती मधून ही जागा सोडवून घेतली जावी. यासाठी विश्वजीत गायकवाड यांनी तब्बल 100 हून अधिक गाड्या उदगीर, जळकोट तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी यांना घेऊन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पक्षाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन उदगीर ची जागा भारतीय जनता पक्षालाच सोडली पाहिजे, असा हट्ट धरला आहे. त्यामुळे आ. संजय बनसोडे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. जर भारतीय जनता पक्षाला उमेदवारी न देता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला उमेदवारी दिली गेली तर भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने विश्वजीत गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केली जाणार असल्याची चर्चा मतदारसंघात होत असून विश्वजीत गायकवाड मोठमोठे कार्यक्रम लावून प्रचार यंत्रणेला त्यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे जागा वाटपाच्या दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या समोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाच्या नेत्या उषाताई कांबळे यांनी आपली प्रचार यंत्रणा सुरू ठेवली आहे. मतदार संघात गावागावात जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत. मोठ-मोठे कार्यक्रमाचे आयोजन ही त्या करत आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे हे सर्व चित्र पाहिल्यास कार्यकर्ते आणि मतदार चांगले संभ्रमित झाले आहेत. येत्या दोन-चार दिवसात चित्र स्पष्ट होईल असे वाटत असतानाच उदगीर विधानसभा मतदारसंघांमध्ये मात्र इच्छुकांची मोठी धावपळ सुरू झाली आहे. अनेकांनी आपले देव पाण्यात ठेवल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
सद्यस्थितीत विद्यमान आ. संजय बनसोडे आणि भारतीय जनता पक्षाकडून विश्वजीत गायकवाड यांच्या प्रचाराचा धुमधडाका चालू आहे. त्यास तोडीस तोड म्हणून महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी आ. सुधाकर भालेराव आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्या उषाताई कांबळे यांनी ही जोर लावून प्रचार सुरू ठेवला आहे. अद्याप चित्र स्पष्ट नसतानाही माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनीही आपले घोडे दामटणे चालूच ठेवले आहेत. त्यामुळे तिकीट निश्चित होईपर्यंत मतदार तटस्थ दिसून येतील अशी शक्यता आहे.
चौकट……
स्वप्निल जाधव मनोज दादा जरांगे कडे..
उदगीर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार स्वप्नील जाधव यांनी अंतरवली सराटी येथे इच्छुक उमेदवारांच्या बैठकीत हजेरी लावून, मनोज रगे पाटील यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतल्याने उदगीर विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आले आहे.