अभिजात भाषेमुळे मराठी माणसाची जबाबदारी वाढली – डॉ.संदीप सांगळे
उदगीर (एल.पी.उगीले) : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. भारत सरकारची राज्यमान्यता या भाषेला मिळाली. शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात या निमित्ताने भाषेच्या दृष्टिकोनातून अनेक संधी उपलब्ध होतील. मराठी अभ्यासकांना यापुढे नियोजन करून भाषेची ज्ञान परंपरा जपता आली पाहिजे. एका अर्थाने अभिजात भाषेच्या दर्जामुळे मराठी माणसाची जबाबदारी वाढलेली आहे,असे विचार डॉ.संदीप सांगळे यांनी व्यक्त केले.
श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील मराठी संशोधन केंद्राच्यावतीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याबद्दल अभिजात मराठी आणि मातृभाषेचे भवितव्य या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एन. जी.एमेकर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.संदीप सांगळे उपस्थित होते. सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.
सुशीलप्रकाश चिमोरे यांनी केले.
पुढे बोलताना डॉ.सांगळे म्हणाले, मराठी भाषा अमृतासमान आहे. या भाषेचा वापर दैनंदिन जीवनामध्ये सगळ्यांनी करायला हवा.भाषांतर व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निश्चितच भविष्यात मराठी माणसांना रोजगार उपलब्ध होईल. असे सांगत मराठी भाषा व साहित्याची परंपरा त्यांनी विस्ताराने विशद केली.
अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एन.जी.एमेकर म्हणाले, मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे. दक्षिणेतील अनेक राज्यांमध्ये आपल्या मातृभाषेवर तेथील लोक जीवापाड प्रेम करतात. मराठी माणसाने देखील भवितव्याचा विचार करून मराठी भाषेच्या संवर्धनाकडे अधिक लक्ष द्यायला हवे. ते काम अभिजात भाषेच्या दर्जामुळे निश्चितच होईल, यात शंका नाही.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.आप्पाराव काळगापुरे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रमुख व मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ.पृथ्वीराज तौर, मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ.कांत जाधव,सेवानिवृत्त ग्रंथपाल बाबुराव माशाळकर,तसेच कर्नाटक, गोवा तेलंगणा व महाराष्ट्र या राज्यातून अभ्यासक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठी विभागातील प्रा.राजा कांबळे व ध्वनिमुद्रण केलेले आमच्या महाविद्यालयातील बी.कॉम.चा विद्यार्थी रितेश साबणे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.म.ई.तंगावार तर आभार डॉ.के. के.मुळे यांनी मानले.