सुधाकर भालेरावांच्या ‘जनसंवाद यात्रे’ला जनतेचा उदंड प्रतिसाद
उदगीर (एल.पी.उगीले) : विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा महाविकास आघाडीचे इच्छुक उमेदवार सुधाकर भालेराव यांच्या जनसंवाद यात्रेला उदगीर व जळकोट तालुक्यात जनतेचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
उदगीर विधानसभा मतदारसंघाचे तब्बल दहा वर्षे प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर उदगीर विधानसभा मतदारसंघात मोठा जनसंपर्क वाढवला असून महाविकास आघाडीचे इच्छुक उमेदवार म्हणून मागील दोन आठवड्यापासून महाविकास आघाडीची ‘जनसंवाद यात्रा’ सुरू केली आहे. या जनसंवाद यात्रेमध्ये सुधाकर भालेराव यांनी त्यांच्या आमदारकीच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणसिंग फुंकले आहे.
सुधाकर भालेराव यांच्या या जनसंवाद यात्रेला उदगीर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात मतदार मोठी गर्दी करत आहेत. महाविकास आघाडीच्या या जनसंवाद यात्रेमध्ये महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे व मित्र पक्षांचे प्रमुख पदाधिकारी भालेरावांच्या प्रचारार्थ मोठे कष्ट घेताना दिसत आहेत. त्यामुळे सुधाकर भालेराव यांच्या उमेदवारीची आता औपचारिकता शिल्लक राहिली आहे. या जनसंवाद यात्रेतून सुधाकर भालेराव यांनी उदगीर विधानसभा मतदारसंघात प्रचारात आघाडी घेतली असून आगामी काळात महायुतीच्या उमेदवारासमोर सुधाकर भालेराव यांचे मोठे आव्हान असणार हे मात्र निश्चित झाले आहे.