लोककल्याण आणि समाजसेवेचा विचार करणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी आपण – मनोज दादा जरांगे
अंतरवाली सराटी (प्रतिनिधी) : सामाजिक जाणीव जपत जपत लोकांचे कल्याण व्हावे, असा विचार करून कार्य करणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी आपण निश्चितपणे उभे राहू. मी समाजासाठी काम करतोय, जे कोणी अशाच पद्धतीची विचारधारा घेऊन पुढे येत आहेत, त्यांचा मी निश्चित विचार करेन. असा शब्द उदगीर येथून त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या उदगीरचे युवा नेते विश्वजीत गायकवाड आणि त्यांच्या शिष्टमंडळाशी बोलताना मनोज दादा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
इंजि. विश्वजीत अनिलकुमार गायकवाड फाउंडेशन च्या वतीने उदगीर विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य परिवारातील आणि गरीब परिवारातील जवळपास 30000 मुलांना वाटप केलेल्या शैक्षणिक साहित्याची, महिला स्वावलंबनासाठी महिलांना प्रशिक्षण देऊन शेकडो शिलाई मशीन वाटप केल्याची आणि त्या शिलाई मशीनच्या आधारे त्यांनी केलेल्या शिलाई कामाची खरेदी करून फाउंडेशन च्या वतीने समाजातील गरजूंना त्याचे मोफत वाटप केले. ग्रामीण भागातील वयोवृद्ध गोरगरिबांसाठी आरोग्य सेवा देता यावी म्हणून ई ॲम्बुलन्सच्या सुविधा उदगीर विधानसभा मतदारसंघांमध्ये उपलब्ध करून दिल्या. ग्रामीण भागातील वृद्धांसाठी सर्व रोग निदान शिबिर, नेत्र रोग निदान व शस्त्रक्रिया शिबिर घेऊन मोफत चष्मे व औषध वाटप शिबिरांचेही आयोजन करून हजारो वृद्धांना आधार दिला, अशा एक ना अनेक सामाजिक उपक्रमांची माहिती शिष्टमडळातील प्रमुखांनी मनोज दादा जरांगे पाटील यांना सांगितल्यानंतर या समाजसेवेसाठी विश्वजीत गायकवाड यांनी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नाचे कौतुक त्यांनी केले. सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी अशा कर्तबगार आणि सामाजिक जाणीव जपणाऱ्या उमेदवाराची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या समाजकार्याचे कौतुक मनोज जरांगे पाटील यांनी केल्याबद्दल विश्वजीत अनिलकुमार गायकवाड फाउंडेशन च्या वतीने मनोज दादा जरांगे पाटील यांचा सत्कार करून आशीर्वाद घेण्यात आला.
अंतरवाली सराटी येथे मनोज दादा जरांगे यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे विश्वजीत अनिलकुमार गायकवाड यांच्यासोबत गेलेल्या शिष्टमंडळाला दुप्पट बळ मिळाल्याचेही याप्रसंगी पॅंथरनेते निवृत्तीराव सांगवे, बहुजन विकास अभियानचे संजय कुमार कांबळे एकुरकेकर यांनी सांगितले.
या शिष्टमंडळात युवा भीमसेनेचे पंकज काटे, भारतीय दलित पॅंथर चे संभाजी तिकटे ,प्रकाश मसुरे, नौशाद मौलाना, माजी नगरसेवक मुन्ना मदारी इत्यादी पदाधिकाऱ्यांसह विश्वजीत गायकवाड समर्थकासह सर्व जाती धर्मातील आणि सर्व समाज घटकातील युवा कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.