उदयगिरी महाविद्यालयाने प्रगतीची दारे उघडली – मंगेश झोले
उदगीर (एल.पी.उगीले) महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी केलेल्या संस्कारांमुळेच यशाचे शिखर सर करू शकलो. सातत्यपूर्ण प्रयत्नांची पराकाष्टा केल्यामुळे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत भरती होता येते. याची जाणीव ग्रामीण भागातून येणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांना उदयगिरी महाविद्यालयाने करून दिली. उदयगिरी महाविद्यालयामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात प्रगतीची दारे उघडली आहेत, असे मत उपविभागीय कामगार आयुक्त मंगेश झोले यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात आयोजित विद्यार्थी कल्याण मंडळ व वाणिज्य मंडळ २०२४-२५ उद्घाटन समारंभात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्ष डॉ. रेखा रेड्डी या होत्या. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे ज्येष्ठ सदस्य प्रा. मनोहरराव पटवारी, मन्मथ बिरादार, शिवराज वल्लापुरे, प्रशांत पेन्सलवार, ललिता पाटील, महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूरचे माजी प्राचार्य डॉ. श्रीरंग खिल्लारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. जी. पाटील, पर्यवेक्षक प्रा. संजय मुडपे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रभारी डॉ. सुरेश लांडगे, विद्यापीठ प्रतिनिधी सुप्रिया जगताप, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. बालाजी होकरणे, वाणिज्य मंडळाचे अध्यक्ष विकास म्हेत्रे यांची विशेष उपस्थिती होती.
पुढे बोलताना मंगेश झोले म्हणाले, प्रत्येक माणसाला आयुष्यात विविध टप्प्यावर परीक्षा द्यावी लागते. त्याकरिता आपण तयार असले पाहिजे. शासनाच्या विविध योजनांचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घेतला पाहिजे. ध्येयवेडी माणसेच इतिहास निर्माण करू शकतात. त्यामुळे स्वतःला ओळखा आणि प्रगती करा, असा मौलिक सल्ला उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. याप्रसंगी डॉ. श्रीरंग खिल्लारे म्हणाले, विद्यार्थी कल्याण मंडळातून नेतृत्व विकसित होत असते. परिस्थितीची जाणीव असणारेच विद्यार्थी आयुष्यात प्रगती करतात. आदर्श नागरिकांसमान सर्व विद्यार्थ्यांनी आपले वर्तन ठेवावे. आदर्श खूप दूर नसतात तर आपल्या आजूबाजूलाच असतात. ते आपण ओळखले पाहिजे व आपणही तसा आदर्श बनले पाहिजे, असे आवाहन उपस्थितांना केले. संस्थेचे ज्येष्ठ सदस्य प्रा. मनोहरराव पटवारी म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश मिळविता येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे मंगेश झोले आहेत. जिद्दीच्या बळावर स्वप्नपूर्ती करता येते, याचा आदर्श वस्तूपाठच झोले यांनी घालून दिला आहे. विद्यार्थ्यांनी चारित्र्यवान नागरिक, अधिकारी होऊन समाजाची सेवा करावी, असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप करताना संस्था उपाध्यक्ष रेखा रेड्डी म्हणाल्या, आईवडिलांच्या परिश्रमाची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी. तसेच उदयगिरीत विद्यार्थी विकासासाठी निर्माण करण्यात आलेल्या सर्व संधींचा लाभ घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
याच कार्यक्रमात दुग्धशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुरेश लांडगे लिखित ‘गुरांचे नियमित व्यवस्थापन’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. नि:पक्षपाती मतदानासाठी विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. तसेच विद्यार्थी कल्याण मंडळाच्या सदस्यांनादेखील शपथ देण्यात आली. अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. यामध्ये महाविद्यालयात पदवी विज्ञान शाखेत सर्वप्रथम आल्याबद्दल शेख जवेरिया या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘ज्ञानतीर्थ -२०२४’ आंतर महाविद्यालय युवक महोत्सवात वैयक्तिक स्त्री अभिनय कलाप्रकारात तृतीय पारितोषिक संपादित केल्याबद्दल कु. करुणा भदाडे या गुणी कलावंत, मार्गदर्शक अमित सोनकांबळे, सुनील ममदापूरे व समूह यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर राज्यस्तरीय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेसाठी महाविद्यालयातून निवड झालेल्या नुपूर मलवाडे, राजनंदिनी लोया, किरण मरेवाड, बालिका ढगे, सायली सोनकांबळे या खेळाडूंचा देखील सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांनी तर पाहुण्यांचा परिचय प्रा. संजय मुडपे यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. अर्चना मोरे यांनी तर आभार डॉ. सुरेश लांडगे यांनी मानले.