तादलापूर चेक पोस्टवर दोन लाखाची रोकड जप्त
उदगीर (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमा भागात मोठ्या प्रमाणात चेक पोस्ट उभारण्यात आले असून कडक तपासणी केली जात आहे. यादरम्यान तादलापूर चेक पोस्टवर पथकाने एका कारची झडती घेतली असता यावेळी दोन लाखांची रोकड हाती लागली. कार मध्ये असलेल्या लोकांनी या पैशाबाबत योग्य स्पष्टीकरण आणि पुरावे न दिल्याने ती रक्कम जप्त केली आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर तादलापूर येथील चेक पोस्टवर स्थायी निगराणी पथक क्रमांक एक यांच्याकडून वाहनांचे तपासणी केली जात होती. इस्लापूर ता. किनवट जि नांदेड येथून देवनी येथे निघालेल्या कारमध्ये (एम एच 43 बीसी 2257) दोन लाखांची रोकड वाहतूक केली जात होती. दरम्यान चेक पोस्टवर तपासणी केली असता दोन लाखाची रोकड आढळून आली. यावेळी कारमध्ये किरण परमेश्वर कांडगे (रा. दहेगाव ता. किनवट जि नांदेड) यांच्यासह इतर चार जण होते. असे आचारसंहिता प्रमुख गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांनी सांगितले. या कारवाई पथकामध्ये टी.व्ही. सावरे, व्ही.एम. साळुंखे, वि एम पाटील, पोलीस कर्मचारी पी. वाय. माने यांच्या पथकाने ही कारवाई केली.