विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 24 ठिकाणी नाकाबंदी
उदगीर (एल.पी.उगीले) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात एकूण 24 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. कर्नाटक राज्यातून येणाऱ्या सर्व गाड्यांची तपासणी केली जात आहे. आंतरराज्य सीमेवरील महाराष्ट्र-कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या रस्त्यावरील शिरोळ- जानापुर, तादलापूर, औराद शहाजानी, तोगरी, बोंबळी, ममदापूर मोड या ठिकाणी नाकाबंदी व चेकपोस्ट तयार करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या चेकपोस्ट/ नाकाबंदी पॉईंटवर केंद्रीय दलाचे जवान, लातूर पोलीस, तसेच निवडणूक आयोगाचे अधिकारी/ कर्मचारी मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले असून सर्व वाहनांची कसून चौकशी व तपासणी करत आदर्श आचारसंहिता राबवत आहेत.
आंतरराज्य चेकपोस्ट, नाकाबंदी सोबतच आंतरजिल्हा 09 ठिकाणी लातूर-धाराशिव हद्द, कानडे बोरगाव, कळब रोड, पळशी फाटा, पानगाव, सांगवी फाटा, टोल नाका किनगाव, जांब जळकोट, बेलकुंड, किल्लारी येथे नाकाबंदी/चेकपोस्ट लावण्यात आलेले आहेत तर जिल्हाअंतर्गत बारा नंबर पाटी, हरंगुळ, कळंब रोड, महाराणा प्रताप नगर, बाभळगाव रोड, हडोळती,आष्टा मोड, शिरशीमोड निलंगा, आरी मोड कासारशिरशी या 09 ठिकाणी नाकाबंदी/चेकपोस्ट तयार करण्यात आले असून लातूर शहरात येण्यासाठी असणारे प्रमुख मार्ग आहेत त्या प्रमुख मार्गांवर नाकाबंदी चेकपॉइंट तयार करण्यात आली आहेत.
विधानसभा निवडणूक अनुषंगाने निवडणूक आयोगाचे अधिकारी कर्मचारी, केंद्रीय दलाचे 300 जवानासोबतच लातूर पोलीस चे अधिकारी/अमलदार व एक कॅमेरामन असा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. बाहेरून येणाऱ्या सर्व गाड्यांची कसून चौकशी केली जाते. तसेच निवडणूक काळामध्ये गाडीतून संशयास्पद वस्तूंची देवाण-घेवाण होणार नाही त्या अनुषंगाने प्रत्येक आवश्यक त्या ठिकाणी नाकाबंदी, चेकपोस्ट, स्थिर निगराणी पथक पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आली आहे. येणारी जाणारी प्रत्येक गाडीची कसून चौकशी पोलीस करत आहेत. काही संशयास्पद आढळल्यास त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात येत आहे.
सदरच्या नाकाबंदी, चेकपॉइंट, स्थिर निगराणी पथकला पोलीस अधीक्षक समय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे व इतर वरिष्ठ अधिकारी वेळोवेळी भेटी देऊन मार्गदर्शन व सूचना करीत आहेत. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात सदर नाकाबंदी/चेकपोस्ट चे काम उत्तमरित्या पार पडत आहे.