19 वर्षांपासून फरार असलेला आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
लातूर (प्रतिनिधी) : दरोडाच्या गुन्ह्यातील गेल्या 19 वर्षापासून फरार असलेला आरोपी लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केला.
महादेव उर्फ प्रशांत दिगंबर करपे, (रा. जवळबन,तालुका केज जिल्हा बीड). असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रेनापुर ते अंबाजोगाई कडे जाणाऱ्या रोडवरील एका हॉटेल समोरून सापळा लावून करपे याला अटक केली. महादेव उर्फ प्रशांत दिगंबर करपे याचे विरोधात 2005 मध्ये पोलीस ठाणे औसा येथे अन्य साथीदारासह दरोड्याचा गुन्हा दाखल होता. पोलीस ठाणे औसा येथे नमूद आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता . सतत राहण्याचे ठिकाण बदलत असल्याने तो पोलिसांना मिळून येत नव्हता. विधानसभा निवडणूक अनुषंगाने लातूर जिल्ह्याच्या पोलीस रेकॉर्ड वरील पाहिजे व फरारी आरोपींना जेरबंद करण्याकरिता पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सूचित केले होते. त्या अनुषंगाने लातूर जिल्ह्याच्या रेकॉर्डवरील फरार,पाहिजे आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखेकडून शोध घेण्यात येत होता.
दिनांक 29/10/2024 रोजी लातूर जिल्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेत असताना गुप्त माहिती मिळाले की, महादेव उर्फ प्रशांत करपे हा रेनापुर ते अंबाजोगाई जाणाऱ्या रोडवरील एका हॉटेल समोर थांबलेला आहे. त्यावरून तात्काळ पोलीस पथक सदर ठिकाणी पाठवून नमूद घटनास्थळावरून आरोपीला जेरबंद केले असून पुढील पुढील तपासकामी महादेव उर्फ प्रशांत दिगंबर करपे याला औसा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस अंमलदार साहेबराव हाके, मनोज खोसे, नितीन कटारे, राहुल कांबळे, चालक पोलीस अमलदार सूर्यवंशी यांनी केली आहे.