मैत्री प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाद्वारे जनजागृती करून दुग्ध उत्पादन वाढीस हातभार लावा – डॉ. नंदकुमार गायकवाड
उदगीर (प्रतिनिधी) : ‘मैत्री’ प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाद्वारे जनावरांतील गर्भधारणा दर वाढवण्याबरोबरच जनजागृती करून दुग्ध उत्पादन वाढीस हातभार लावावा, असे प्रतिपादन डॉ. नंदकुमार गायकवाड, सहयोगी अधिष्ठाता, पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर यांनी केले. ते ‘राष्ट्रीय गोकुळ मिशन’ अंतर्गत महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर; पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पशुप्रजनन व स्त्रीरोगशास्त्र विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर येथे आयोजित ‘ग्रामीण भारतासाठी बहुउद्देशीय कृत्रिम रेतन तंत्रज्ञ’ दुसऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमातील प्रशिक्षणार्थींच्या प्रमाणपत्र वितरण व सांगता समारंभ कार्यक्रमात अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते. पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील प्रशिक्षण कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. अनिल पाटील, प्रकल्प सह-समन्वयक हे उपस्थित होते.
डॉ. अनिल पाटील यांनी प्रास्ताविका मध्ये या प्रशिक्षणामध्ये राबविण्यात आलेल्या बाबींविषयी सर्वाना अवगत केले, आणि प्रशिक्षणार्थीना वाढलेल्या जबाबदारीची आठवण करून दिली. आपल्या मार्गदर्शनात डॉ. नंदकुमार गायकवाड यांंनी पुढे बोलताना स्पष्ट केले की, प्रशिक्षित तरुणांनी पशुपालकांना उत्तम व वेळेवर सेवा देऊन पशुपालकांच्या अडचणी सोडवून तसेच योग्य वेळी कृत्रिम रेतन करून जनावरांतील गर्भधारणा दर वाढवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहावे. यामुळे जनावरांचा भाकडकाळ कमी होऊन जनावरापासून उत्पादनकाळ जास्त मिळेल आणि पशुपालकांची आर्थिक उन्नती होईल, असे प्रतिपादन केले. लातूर व नांदेड जिल्ह्यातील ३० सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी सदर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले, म्हणून त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यावेळी प्रशिक्षणार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले, व प्रशिक्षणामधून मिळालेल्या ज्ञानाबाबत समाधान व्यक्त करून आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशिक्षण सहसमन्वयक डॉ. प्रफुल्लकुमार पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्रशिक्षण सहसमन्वयक डॉ. राहुल सूर्यवंशी यांनी केले. यावेळी प्रशिक्षणार्थी आणि इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.