9 रोजी शरद पवाराची तोफ उदगीरात धडाडणार
उदगीर (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा खा. शरदचंद्र पवार हे उदगीर येथील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आ. सुधाकर भालेराव यांच्या प्रचारासाठी दिनांक 9 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा परिषदेच्या मैदानावर जनतेला संबोधित करणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटी नंतर राष्ट्रवादीचे आमदार संजय बनसोडे यांनी शरदचंद्र पवार यांची साथ सोडून अजित दादा ची साथ धरल्यामुळे या सभेमध्ये शरदचंद्र पवार काय बोलतील? याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
यापूर्वी माजी आ. सुधाकर भालेराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या सभेला संबोधित करताना खा. सुप्रियाताई सुळे आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांनी महाराष्ट्राचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या विरोधात चांगलेच मैदान गाजवले होते. पक्ष सोडून गेल्याबद्दल टोकाची टीकाही केली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता दस्तुरखुद्द खासदार शरदचंद्र पवार काय बोलणार? हे ऐकायला उदगीरची जनता उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. उदगीर विधानसभा मतदारसंघात एकूण 13 उमेदवार असले तरी खऱ्या अर्थाने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच लढत होणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे या सभेला अन्यन्य साधारण महत्व राहणार आहे.या सभेसाठी उदगीर विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त जनतेने उपस्थित राहावे, असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार सुधाकरराव भालेराव, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, शिवाजीराव मुळे यांनी केले आहे.