काँग्रेसच्या नेत्या माजी नगराध्यक्षा उषा कांबळे यांचा चार माजी नगरसेवकासह राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश
उदगीर (एल.पी.उगीले) : शहरातील म. फुलेनगर येथील प्रचार सभेत काँग्रेस पक्षाच्या नेत्या माजी नगराध्यक्षा उषा कांबळे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत ना. संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काँग्रेसच्या चार माजी नगरसेवकासह प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक श्रीरंग कांबळे, माजी नगरसेवक राजकुमार भालेराव, विलास शिंदे, अशोक जमदाडे यांच्यासह अनेकांनी प्रवेश केला. उषा कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे महायुतीची ताकद वाढली असून त्यांना आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सन्मानाची वागणूक दिली जाईल, अशी ग्वाही ना. संजय बनसोडे यांनी दिली.
यावेळी बोलताना माजी नगराध्यक्षा उषा कांबळे यांनी आपण गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षात निष्ठेने काम केले आहे. मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून आपल्याला सन्मानाची वागणूक मिळाली नाही. प्रामाणिकपणे प्रचारात असताना अविश्वास दाखविण्याचा प्रयत्न केला गेला. याउलट महायुतीचे उमेदवार ना. संजय बनसोडे यांनी मी विरोधी पक्षाची सामान्य कार्यकर्ता असताना माझा नेहमीच सन्मान केला असल्याचे सांगत उषा कांबळे यांनी उदगीरच्या विकासासाठी आपण ना. बनसोडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. महायुतीने प्रकाशित केलेला जाहीरनामा हा महिलांना सन्मान देणारा आहे. हा जाहिरनामा आपल्याला आवडला असल्यानेच आपण महायुतीमध्ये आल्याचे सांगून उषा कांबळे यांनी महायुतीचे उमेदवार संजय बनसोडे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.