आणखीन दोन सराईत गुन्हेगार लातूर जिल्ह्यातून हद्दपार (तडीपार)
लातूर (एल.पी.उगीले) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी या उद्देशाने जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती मोडीत काढण्यासाठी लातूर पोलिसांनी कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून समाजकंटक आणि पोलिसांच्या दृष्टीने समाज विघातक कृत्य करणाऱ्या व्यक्तींना जिल्ह्यातून हद्दपार करण्याची मोहीम गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे. त्यात भर टाकत आणखी दोन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
याबाबत याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलीस ठाणे शिवाजीनगर, तसेच लातूर शहरातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत टोळी तयार करून वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या सराईत दोन गुन्हेगारां विरुद्ध एक वर्षा करिता हद्दपारीची (तडीपार) कारवाई करण्यात आली आहे.
हद्दपारची कारवाई करण्यात आलेल्याचे नावे गणेश महादेव माने, (वय 22 वर्ष, राहणार प्रवणश्री अपार्टमेंट, खोरी गल्ली, लातूर), विश्वजीत अभिमन्यू देवकते, (वय 23 वर्ष, राहणार कातपुर तालुका जिल्हा लातूर).असे असून नमूद आरोपींतावर पोलीस ठाणे शिवाजीनगर व लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीमध्ये समाजविघातक कारवाया करणे, परिसरातील रहिवासी लोकांच्या मालमत्तेला इजा पोहोचून भय निर्माण करणे, प्राणघातक शस्त्र वापरून दहशत निर्माण करणे, आजन्म कारावास किंवा अन्य करावासाचे शिक्षेस प्राप्त असलेले गुन्हे करणे, शांतता भंग करणे, यासारखे गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्यामुळे सामाजिक शांतता धोक्यात आली होती.
विधानसभा निवडणूक अनुषंगाने जिल्ह्यात शांतता अबाधित राहावी. याकरिता नमूद सराईत गुन्हेगारांकडून कोणत्याही प्रकारचे गैरकायदेशीर कृत्य घडू नये, याकरिता लातूर शहरात वारंवार मालमत्ता विषयी व शरीराविषयी गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करून सामाजिक शांतता करणाऱ्या गुन्हेगाराना 1 वर्षासाठी लातूर जिल्ह्यातून हद्दपार (तडीपार) करण्यात आले असून नमूद गुन्हेगारांना लातूर जिल्ह्याच्या हद्दीच्या बाहेर सोडण्यात आले आहे.
नमूद आरोपी विरुद्ध तात्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी, (लातूर शहर) सहाय्यक पोलीस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी,पोलीस ठाणे शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक दिलीप सागर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, पोलीस अमलदार प्रदीप स्वामी, पोलीस ठाणे शिवाजीनगर चे पोलीस अंमलदार बालाजी कोतवाड, रणजीत शिंदे ,धैर्यशील मुळे, पद्माकर लहाने, काकासाहेब बोचरे यांनी सविस्तर हद्दपार प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्याकडे पाठविले होते. त्यावर पोलीस अधीक्षकांनी सदर प्रस्तावांचे अवलोकन करून नमूद आरोपी मुळे सामाजिक शांततेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने व विधानसभा निवडणुका व आगामी सण-उत्सव अनुषंगाने त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 प्रमाणे कार्यवाही करून सदर सराईत गुन्हेगारांना लातूर जिल्ह्यातून हद्दपार (तडीपार) करण्यात केले आहे.
गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या सराईत गुन्हेगार, उपद्रवी लोकांवर जरब बसवण्यासाठी या आधी अनेक गुन्हेगाराना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. त्यामुळे इतर गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यां गुन्हेगारांना चांगलाच दणका बसला आहे.