तुरीच्या पिकावर अळी पडल्याने शेतकरी परेशान
उदगीर (एल.पी.उगीले) : गेल्या कित्येक वर्षापासून तूर या पिकावर वेगवेगळे रोग पडत आल्यामुळे आणि पीक वाळून जाऊ लागल्यामुळे मध्यंतरीच्या काळात तुर पिक घेणे शेतकरी टाळत होते. मात्र यावर्षी जास्त भाव मिळाल्यामुळे शेतकरी पुन्हा तुरीच्या लागवडीकडे वळला आहे. मात्र शेतकऱ्याच्या अडचणी त्याच्या पाचवीलाच पुजल्या की काय? असे म्हणण्याची वेळ आली आहे. सध्या ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तसेच थंडी पडल्यामुळे फुलोऱ्यात आलेल्या तुरीवर अळी पडली आहे. सुरुवातीला अनेक कीटकनाशकांचे फवारणी शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र तरी देखील ऐन मोसमात तुरीवर अळी पडल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. खरीप हंगामातील दीर्घ मुदतीचे पीक म्हणून तूर ओळखली जाते. शेतकऱ्याचे अर्थचक्र सुधारेल, अशी अपेक्षा तुरीच्या पिकाकडून केली जात होती. मात्र ती अपेक्षाही आता धुळीस मिळत आहे. सोयाबीनच्या पिकाला हमीभाव मिळाला नाही, अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी हमीभावाची वाट न बघता मिळेल त्या भावाने सोयाबीन बाजारात विकले आहे. काही शेतकऱ्यांनी घरी साठवून ठेवले आहे. मात्र त्यालाही भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्याची पूर्ण बिशाद ही तुरीच्या पिकावर होती, मात्र ढगाळ वातावरणामुळे निर्माण झालेल्या संकटापुढे शेतकरी हातबल झाला आहे.
उदगीर तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक छोट्या-मोठ्या खेड्यातून तुरीच्या पिकावर नवे संकट आले आहे. एक तर सुरुवातीच्या काळात सततच्या पावसाने अनेक पिकांचे नुकसान केले होते. मात्र तरी देखील शेतकऱ्यांच्या आशा तुरीच्या पिकावर अवलंबून होत्या. मात्र त्याही आशा मावळतात की काय? अशी शंका निर्माण झाली आहे. कारण या पिकावर कीड व अळीचा प्रादुर्भाव निर्माण झाला आहे.
चौकट…..
तुरीच्या पिकावर मोठ्या प्रमाणात अळीचा व मर रोगाचा प्रादुर्भाव झाला असून यामुळे शेतकऱ्यांना वेळीच कृषी विभागाच्या वतीने मार्गदर्शन करणे गरजेचे होते. मात्र तसे मार्गदर्शन झाले नाही. सध्या इतरत्र शेतीमालाच्या तुलनेत तुरीला हमीभाव व बाजारभाव चांगला आहे. त्यामुळे आंतरिक पीक म्हणून शेतकरी तूर पिकाला प्राधान्य देतात, मात्र सध्या सोयाबीन पीक हातचे गेले आहे. कापसाचे उत्पादन घटले आहे. आता तूर रब्बी पिकावर शेतकऱ्यांच्या अशा असताना मागील काही दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे कीड रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांमधून विविध कीटकनाशकाच्या फवारणीवर भर दिला जात आहे. मात्र कृषी विभागाकडून नेमक्या कोणत्या कीटकनाशकाचे फवारणी करावी? यासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे असतानाही वेळीच तसे मार्गदर्शन झालेले नाही, ही अत्यंत शोकांतिका आहे. अशी प्रतिक्रिया प्रगत शेतकरी भास्कर कुंडगीर इसमालपूर तालुका उदगीर यांनी व्यक्त केली आहे.
चौकट….
कृषी खात्याने वेळेवर मार्गदर्शन केले असते तर शेतकऱ्याचे नुकसान ठरले असते….
अल्पभूधारक शेतकऱ्यांनी अक्षरश: तळहाताचा फोड जपावा, तशा पद्धतीने तुरीच्या पिकाची जपवणूक केली आणि नगदी पीक म्हणून काळजी घेतली, मात्र ऐन तुरीला फुलधारणा होत असतानाच काही पीक वाळून जात आहे. तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आळी पडल्याने पाणी कातरली जात आहेत. तसेच फुल देखील कुरतडले जात आहे. यासंदर्भात कृषी विभागाने जर वेळेवर बांधावर येऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले असते, तर अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला असता अगोदरच सोयाबीन अतिवृष्टीमुळे गेले असता तूर रोगाने वाळून जात आहे. आणि त्यात आळी पडल्याने तर नुकसानीची खात्री झाली आहे. त्यामुळे कृषी विभाग शेतकऱ्याच्या हितासाठी काम करतो, की गप्पा मारण्यासाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे. दुर्दैवाने गेल्या तीन वर्षापासून शेतकऱ्यांना पिक विमा देखील मिळाला नाही, त्यामुळे प्रशासनाने तात्कळ लक्ष देऊन किमान तुरीवर पडलेली अळी आणि मररोग याच्यावर प्रतिबंधात्मक तातडीने काय करता येईल? या संदर्भात मार्गदर्शन करावे.
लक्ष्मण फुलारी भालके
किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस लातूर