उदगीर येथे “जागतिक दिव्यांग दिन” उत्साहात साजरा
उदगीर (प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावे व त्यांना मानाचे स्थान मिळावे, यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. 3 डिसेंबर हा जगभरात जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो. उदगीर येथील संधी निकेतन शिक्षण संस्था वडगाव संचलित जीवन विकास निवासी मतिमंद कर्मशाळेमध्ये जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या व सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले. सर्व प्रवेशितांना थंडीसाठी उलन-टोप्या वाटप करण्यात आले, फळे व बिस्किट वाटप करून उत्साहात हा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमेश वडगावकर, प्रेरणा विद्यालय चे मुख्याध्यापक शशिकांत मोखेडे व कंधार येथील मतिमंद विद्यालयाचे पठाण मेहताब उपस्थित होते.
कर्मशाळेचे अधीक्षक राजापटेल अ.मलिक यांनी शाळेमार्फत राबविले जाणारे विविध उपक्रमांची यावेळी माहिती दिली. प्रवेशितांचे सामाजिक, व्यवसायिक, आर्थिक पुनर्वसन संदर्भात केले जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष रमेश वडगावकर यांनी उत्तम व दर्जेदार कार्य करण्यासंदर्भात उपस्थित सर्व कर्मचारी व पालकांना मार्गदर्शन केले. कसलीच सोयीसुविधा कमी पडू दिली जाणार नाही याची ग्वाही दिली. या निमित्ताने कर्मशाळेत नव्याने तयार करण्यात आलेल्या व्हॉलीबॉल ग्राऊंडचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.