मैत्री’ प्रशिक्षणांमधून प्राप्त होणाऱ्या कौशल्याचा वापर पशुपालकांच्या उत्पन्नवाढीसाठी करून स्वतः स्वावलंबी व्हावे : डॉ. अनिल भिकाने
उदगीर (प्रतिनिधी) : ‘राष्ट्रीय गोकुळ मिशन’ अंतर्गत महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर; पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पशुप्रजनन व स्त्रीरोगशास्त्र विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर येथे आयोजित ‘ग्रामीण भारतासाठी बहुउद्देशीय कृत्रिम रेतन तंत्रज्ञ’ (मैत्री) प्रशिक्षण कार्यक्रमाचा उदघाटन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी उदघाटक व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अनिल भिकाने, संचालक, विस्तार शिक्षण, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर हे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. नंदकुमार गायकवाड, सहयोगी अधिष्ठाता, पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर,तसेच महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. अशोक देवांगरे, आणि डॉ. अनिल पाटील, प्रकल्प सह-समन्वयक उपस्थित होते. पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील तिसऱ्या प्रशिक्षण कार्यकमाचे आयोजन दि. २५ नोव्हेंबर ते २४ डिसेंबर २०२४ दरम्यान करण्यात आले आहे.
डॉ. अनिल पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये सदर प्रशिक्षण कालावधी दरम्यान घेण्यात येणारी व्याख्याने, प्रात्यक्षिके, राहण्याची सुविधा या बाबत माहिती दिली. सदर प्रशिक्षण कार्यक्रमातून कृत्रिम रेतनाबरोबरच पशुआहार, पशुधन व्यवस्थापन, चारा उत्पादन याविषयी पुरेसे ज्ञान घेऊन त्याचा वापर पशुपालनामधील व्यवस्थापनात सुधारणा करण्यासाठी करून पशुपालकांना जास्तीत जास्त नफा कसा मिळेल यासाठी प्रयत्न करावा असे मत डॉ. नंदकुमार गायकवाड यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात व्यक्त केले. पशुपालकांच्या गोठ्यावर त्यांना वेळेवर चांगल्या पद्धतीने कृत्रिम रेतन सेवा आणि रोगप्रतिबंधात्मक बाबीसाठी मार्गदर्शन करावे हा या ‘मैत्री’ प्रशिक्षणाचा उद्देश आहे. तसेच या प्रशिक्षणातून मुबलक ज्ञान ग्रहण करून पशु कल्याणासाठी काम करा आणि पशुपालकांचे अर्थार्जन वाढवून स्वतः स्वावलंबी बना असे आव्हान ही आपल्या उदघाटनपर भाषणात पुढे बोलताना डॉ. भिकाने यांनी प्रशिक्षणार्थीना केले. या प्रशिक्षणामध्ये सोलापूर जिल्ह्यातील ३० सुशिक्षित बेरोजगार तरुण सहभागी झाले आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रफुल्लकुमार पाटील यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. राहुल सूर्यवंशी, प्रशिक्षण सह समन्वयक यांनी केले. यावेळी प्रशिक्षणार्थी आणि इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.