आले जरी शहाजी उमाप !! वाढवणा हद्दीत अवैध धंदे अमाप !!

0
आले जरी शहाजी उमाप !! वाढवणा हद्दीत अवैध धंदे अमाप !!

आले जरी शहाजी उमाप !! वाढवणा हद्दीत अवैध धंदे अमाप !!

उदगीर (एल पी उगीले) : उदगीर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये आता हळूहळू अवैध धंदे पाय पसरू लागले आहेत. मध्यंतरीच्या काळात आयपीएस अधिकारी बी चंद्रकांत रेड्डी यांनी बऱ्यापैकी धाडसत्र चालउन अवैध धंदेवाल्यांच्या मनामध्ये एक दहशत निर्माण केली होती. मात्र त्यानंतर आता स्थानिक पोलिसांनी पाठबळ दिल्याने की काय? पुन्हा पूर्ववत अवैध धंदे बाळसे धरू लागले आहेत, आणि त्या अवैध धंद्याचे लोन शहरांमध्येही पसरू लागले आहे.
ग्रामीण हद्दीतील वाढवणा पोलीस स्टेशनच्या अनेक महत्त्वाच्या गावामध्ये खुल्लम खुल्ला अवैध धंदे चालू असल्याची ओरड आता जनतेतून होऊ लागली आहे. पोलीस प्रशासनाला मात्र याचे काहीही देणे घेणे नाही, इतकेच नाही तर काही पोलीस कर्मचारीच त्या अवैध धंदेवाल्याला प्रोत्साहन देत असल्याचीही चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे कधीकाळी मटक्याला बाय बाय सांगणारा हा भाग आता, ओपन जेऊ देत नाही आणि क्लोज झोपू देत नाही. अशी चर्चा ग्रामीण भागात चालू झाली आहे. गंमत म्हणजे वाढवणा गाव हे उदगीर तालुक्यातील एक मोठी बाजारपेठ म्हणून ओळखले जाते.
त्यासोबतच त्या गावाने महाराष्ट्राला व्हॉलीबॉल चे अनेक खेळाडू दिले आहेत. अजूनही या गावचा व्हॉलीबॉल खेळ प्रसिद्ध आहे. मात्र आता खेळाडू आणि विद्यार्थी देखील या खेळाऐवजी झटपट श्रीमंत होण्याच्या नादात मटक्याच्या आकड्याचा खेळ खेळू लागले आहेत. गावातील अनेक टपऱ्यावरून आणि पत्र्याच्या शेडमध्ये सहज उपलब्ध होणारे हे जुगार विद्यार्थ्यांना देखील आकर्षित करू लागले आहेत. काही महिन्यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सक्त ताकीदी नंतर काही काळ मटका, गुटखा, जुगार हे प्रकार बंद झाले होते. मात्र हफ्तेखोर पोलिसांची आवक बंद झाल्यामुळे बंद पडलेले अवैध धंदे कधी चालू होतील? याकडेच त्यांचे लक्ष होते. आणि दुर्दैवाने आता त्या अवैध धंद्यांना चांगले दिवस येऊ लागले आहेत. त्यामुळे ग्रामीण हद्दीमध्ये हे धंदे चांगलेच फोफावू लागले आहेत.
महाराष्ट्र शासनाने तरुणांचे आरोग्य विचारात घेऊन रसायन मिश्रित गुटखा आणि सुगंधी तंबाखू उत्पादन, वाहतूक आणि विक्री यावर प्रतिबंध आणले आहेत. वास्तविक पाहता यामुळे महाराष्ट्र शासनाला कोट्यावधी रुपयांच्या करातून होणाऱ्या उत्पन्नाला मुकावे लागले. मात्र शासनाने फायद्यापेक्षा तरुणांचे भवितव्य महत्त्वाचे समजून गुटखा आणि सुगंधित तंबाखू वर बंदी आणली. तरी देखील शासनाने प्रतिबंधित केलेली गुटखा आणि सुगंधित तंबाखू ग्रामीण हद्दीमध्ये सर्रास उपलब्ध होऊ लागली आहे.
वाढवणा हद्दीमध्ये वाढवणा गावासह आजूबाजूच्या परिसरात आणि मोठमोठ्या गावातील पान टपऱ्यावर चढ्या किमतीने या वस्तू उपलब्ध होऊ लागल्या आहेत. परिणामतः शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा आणि सुगंधित तंबाखूच्या बंदीच्या आदेशाला केराची टोपली भेटली आहे.
यासोबतच गल्लीबोळात चालणारे जुगाराचे अड्डे देखील तरुणांच्या आकर्षणाचे केंद्र बनत आहेत. जुगार आणि मटक्याच्या नादाला लागून सर्वसामान्य कष्टकरी वर्ग, तरुण, सुशिक्षित बेकार आणि बेरोजगार इतकेच नव्हे तर विद्यार्थी देखील आपले पैसे गमावून बसत आहेत. जुगार,मटका याच्या नादात आपल्या जवळील पैसे गमावून बसत आहेत. त्यामुळे तरुणांमध्ये उदासीनता निर्माण होत आहे, आपण गमावलेले ते पैसे आता कुठून आणावेत? या विवंचनेत व्यसनाधीन होत आहेत. आणि गंमत म्हणजे त्यांना व्यसनाकडे आकर्षित करणारी स्वस्तात भेटणारी हातभट्टी आणि देशी दारू गावागावातून सहज उपलब्ध होऊ लागली आहे. या अवैध दारू विक्रीमुळे अनेक संसार उध्वस्त झाले आहेत.
ग्रामीण हद्दीमध्ये अनेक वेळा रणरागिनींनी आपला संसार वाचावा म्हणून, कधी दारू अड्ड्यावर तर कधी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढून अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे अड्डे दाखवले होते. मात्र त्यामुळे गावागावात तणाव आणि वाद निर्माण होऊ लागल्यामुळे सज्जन लोकांनी या दारू विक्रेत्यांच्या नादाला न लागता गपचूप तक्रारी करायला सुरुवात केली आहे. मात्र दुर्दैवाने त्या तक्रारीची कोणीच दखल घेत नसल्याने ते देखील मूग गिळून गप्प आहेत. अशी चर्चा आता गावागावातून चालू आहे.
लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे हे अशा पद्धतीच्या अवैध धंद्याच्या विरोधात आहेत. मात्र त्यांच्या आदेशाला कोलदांडा घालून झारीतले शुक्राचार्य बनलेल्या आणि दलाली मध्ये धन्यता मानणाऱ्या पोलिसांकडून हे अवैध धंदे कायम चालू राहिले पाहिजेत, यासाठीच प्रयत्न चालवले जात आहेत. या धंद्यावर अंकुश ठेवावा म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विशेष पथकेही नेमले आहेत. मात्र ते पथके येणार असल्याचे अगोदर पोलिसांना समजत असल्याने पोलिसातील ते दलाल लगेच अवैध धंदेवाल्यांना या धाडीच्या संदर्भात पूर्वकल्पना देऊन सावध करतात. त्यामुळे जणू सर्व काही अलबेला आहे. अशा पद्धतीचा निरोप वरिष्ठाकडे जात असतो. प्रत्यक्षात मात्र काय चाललेले आहे? हे सर्वसामान्य जनतेला चांगल्यापैकी माहिती असते.
त्यामुळेच आता राजरोसपणे अत्यंत कर्तव्यदक्ष म्हणून ओळखले गेलेले नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या संदर्भात देखील चुकीचे धारणा बनू लागली आहे. परिणामतः आता सर्रास बोलले जात आहे. की,
आले जरी शहाजी उमाप!!
वाढवणा भागात अवैध धंदे अमाप!!
हे चित्र बदलले जावे. आणि ग्रामीण हद्दीमध्ये फोफावत चाललेले अवैध धंदे बंद व्हावेत. प्रत्येक वेळी अशा अवैध धंद्यावर धाडी टाकण्यासाठी लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा किंवा लातूर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकांनीच प्रयत्न करावेत, हे योग्य नाही. जर गुन्ह्याचा शोध स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने लावावा, अवैध धंद्यावर धाडी विशेष पथकांनी किंवा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने टाकाव्यात अशी अपेक्षा असेल तर स्थानिक पोलीस काय केवळ हप्ते गोळा करण्यासाठीच आहेत का? असा प्रश्न जनतेतून उपस्थित केल्याशिवाय राहणार नाही. अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे.

चौकट……
अवैध धंद्याचे पाठराखे कोण?

ग्रामीण हद्दीमध्ये चालू असलेल्या या अवैध धंद्याचे पाठीराखे हे काही गाव पुढारी तर काही पोलीस प्रशासनातील कर्मचारी असल्याचे सर्रास बोलले जाते. तरीदेखील स्थानिक चे पोलीस अधिकारी मूग गिळून गप्प का? पोलीस स्टेशनला येणाऱ्या जाणाऱ्या अधिकाऱ्यांची सोय करण्यात आणि वसुलीसाठी कायम ठेवलेल्या पोलिसांचे दुसरे काय काम आहे? असाही प्रश्न आता जनतेतून उपस्थित केला जातो आहे. जर पोलीस कर्मचारीच वसुलीचा धंदा करत असतील, तर हे अवैध धंदे बंद व्हावेत अशी अपेक्षा ठेवणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षक किंवा विशेष पोलीस महानिरीक्षक यांना यश मिळेल का? हाही मोठा प्रश्न आहे.

चौकट…..
थातुर मातूर कारवाईला जोर …

जनतेतून अवैध धंद्याच्या संदर्भात ओरड होऊ लागली की, वरिष्ठाकडून त्यासंदर्भात जाब विचारला जातो. आणि मग चोर सोडून संन्यासाला फाशी म्हणतात, त्या पद्धतीने मोठे अवैध धंदेवाले बाजूलाच राहतात, किरकोळ जुगार खेळणाऱ्या एखाद्या व्यक्तीला पकडून गुन्हे दाखल करायचे आणि आम्ही फार कर्तबगार आहोत. अशा पद्धतीची बतावणी करत राहायचे. अशा पद्धतीच्या कामगिरीमध्ये देखील अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पटाईत झाले असल्याची चर्चा ग्रामीण हद्दीत चालू आहे.

चौकट……
चमकोगिरीतच सर्वांना रस…..

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्याला चांगले म्हणावे, मग आपल्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कितीही अवैध धंदे असले तरीही त्याची कुठे वाचता होऊ नये, या दृष्टीने काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या आजूबाजूला आपल्याबद्दल गोडवे गाणारे काही भाट सांभाळले असल्याची चर्चा देखील ग्रामीण हद्दीमध्ये चालू आहे. चार आण्याची कर्तबदारी आणि बाराण्याची प्रसिद्धी अशा पद्धतीच्या कामगिरीमध्ये देखील काहीजण आता बऱ्यापैकी पटाईत झाले आहेत. आणि या चमकोगिरीमुळे वरिष्ठ अधिकारी देखील फसतात, अशा चमकोगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा उदो उदो केला जातो. असेही बोलले जात आहे. यासंदर्भात वरिष्ठ पातळीवरून शहानिशा व्हावी, गोरगरिबांच्या संसाराचा विचार करून अवैध धंद्याला मूठ माती मिळावी. अशी जनतेतून मागणी होत आहे. आता सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या अशा अपेक्षा कर्तबगार वरिष्ठ अधिकारी पूर्ण करतात की नाही याकडेही जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *