दणका पोलीस फ्लॅश न्यूज च्या बातमीचा – एलसीबीची उत्कृष्ट कामगिरी !! 16 लाख 33 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू पोलिसांच्या दरबारी !!
लातूर (एल.पी.उगीले) : उदगीर शहरासह ग्रामीण भागात आणि विशेषतः वाढवणा परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालू असल्या संदर्भात साप्ताहिक पोलीस फ्लॅश न्यूजने बातमी प्रकाशित केली होती. आले जरी शहाजी उमाप, चालू आहेत अवैध्य धंदे अमाप, अशा मथळ्याखाली ही बातमी होती. त्या बातमीची दखल घेत लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मोठ्या प्रमाणात बातमीदार नेमून उदगीर ग्रामीण हद्दीकडे येत असलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखू यांच्यासह 16 लाख 35000 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देशित केले आहेत. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करून लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याची मोहीम राबवित आहेत.
अवैध धंद्याची माहिती काढत असताना दिनांक 13/12/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास खात्रीशीर माहिती मिळाली की, एका वाहनातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी व कर्नाटक ते अंबाजोगाई व्हाया उदगीर वाहतूक होणार आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर माहितीची शहानिशा करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उदगीर तालुक्यामध्ये सापळा लावून तसेच सदर गाडीचा जवळपास 20 किलोमीटर पाठलाग करून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणारे वाहन नळेगाव जवळ उदगीर ते घरणी मोड परिसरामध्ये ताब्यात घेतली. सदर वाहनाची झडती घेतली असता सदरचे वाहन हुंडाई कंपनीचे क्रेटा असे असून त्याचा क्रमांक एम.एच. 24 ए.डब्ल्यू. 9899 असा असल्याचे दिसले. त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला वेगवेगळ्या प्रकारचा वाहनासह 16 लाख 33 हजार 700 रूपयाचा गुटखा व सुगंधित तंबाखू , कारसह जप्त करण्यात आले आहे.
प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची अवैधरित्या अंबाजोगाई कडे घेऊन जात असताना गुटख्याची वाहतूक करीत असताना मिळून आलेला इसम नामे सुरज दत्तात्रेय खंडापुरे, (वय 32 वर्ष, राहणार साळुंकवाडी तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड) यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे चाकुर चे पोलीस अधिकारी,अंमलदार करीत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अमलदार सूर्यकांत कलमे, तुळशीराम बरूरे ,पोलीस चालक अमलदार प्रदीप चोपणे यांनी पार पाडली.
वास्तविक पाहता उदगीर परिसरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात राजरोसपणे गुटखा आणि मटका चालू असताना वाढवणा असेल किंवा ग्रामीण हद्द असेल या परिसरातील स्थानिक पोलीस काय करत असतात? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. किमान वरिष्ठ पातळीवरून तरी अधिकाऱ्यांनी या गोष्टीची दखल घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कर्तबगार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या संदर्भात सूचना देऊन प्रतिबंधित असलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखू जप्त केल्याबद्दल जनतेतून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अभिनंदन केले जात आहे.