कला पंधरवाडा अंतर्गत विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : श्यामलाल स्मारक शिक्षण संस्था संचलित श्यामलाल विज्ञान, कला व क्रीडा अकॅडमी प्रस्तुत श्यामकला पंधरवाडा अंतर्गत विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलेले होते. या विज्ञान प्रदर्शनामध्ये श्यामार्य कन्या माध्यमिक विद्यालय व श्यामलाल प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थी खूप मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुपोषपाणि आर्य होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ. कुमठेकर उपस्थित होते. संस्थेच्या सहसचिव अंजुमनी आर्य,पंचायत समिती उदगीर शिक्षक तज्ञ ज्ञानोबा मुंडे, रमाकांत चटनाळे, श्यामलाल विज्ञान कला व क्रीडा अकॅडमीचे संयोजक सेवानिवृत्त मुख्याध्यापक बालाजी चव्हाण, मोहनराव निडवंचे, श्यामार्य कन्या विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक प्रवीण भोळे, श्यामलाल माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भारत खंदारे, श्यामलाल प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विवेक उगिले, पर्यवेक्षक राहुल लिमये, श्यामार्य कन्या विद्यालयाचे पर्यवेक्षक विजय बैले आदी मान्यवर उपस्थित होते.
एकविसावे शतक हे जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणाचे आहे. या बरोबर माहिती तंत्रज्ञानाचे आहे, हे निर्विवाद सत्य आहे. आज माहितीचा प्रचंड विस्फोट झालेला आहे. मागील शतकात जेवढा बदल झाला नाही तेवढा बदल या दशकात झाला आहे. या बदलांना जुळवून घेणारा विद्यार्थी तयार करणे, हे शिक्षकांपुढील आव्हान आहे. काल घेतलेले ज्ञान आज कालबाह्य होत आहे. या तंत्रज्ञानाच्या वेगाशी जुळवून घेणारा विद्यार्थी शिक्षकांना तयार करावयाचा आहे. हा विद्यार्थी विवेकबुद्धीने वागणारा घडला पाहिजे. त्यासाठी शिक्षकांना स्वत:बरोबर विदयार्थ्यांमध्ये अनेक मूल्यांची पेरणी करावी लागणार आहे. त्यातील सर्वांत महत्त्वाचे मूल्य म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन हे होय. हा दृष्टिकोन निर्माण होतो विज्ञान विषयातून विज्ञान हा सर्व शास्त्रांचा पाया आहे, असे डॉ. धनाजी कुमठेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
विज्ञान शिकण्यात आणि वास्तविक जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाची शालेय स्तरावर आवश्यकता असते. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी विविध प्रयोग त्यांच्या समोर सादर करावे लागतात, जर विद्यार्थ्यांनी स्वतः प्रयोग तयार केल्यास विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यास व नवीन संशोधन निर्माण होण्यास मदत होते, असे अध्यक्षीय समारोपातून संस्थाअध्यक्ष आर्य यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विज्ञान विषय विभाग प्रमुख माणिक कांबळे, संभाजी कोयले,समदरे , पाटील यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनाक्षी ऐनिले तर आभार संभाजी कोयले यांनी व्यक्त केले.