एलसीबीचा पुष्पा स्टाईलने चंदन तस्करी करणाऱ्यांना दणका ! 68 किलो चंदन, वाहनासह 11 लाख 22 हजाराचा मुद्देमाल जप्त.
लातूर (एल.पी.उगीले) लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एका नंतर एक तपासामध्ये नवे नवे रेकॉर्ड तयार करायला सुरुवात केली आहे. गुटख्यावर मोठमठ्या धाडी टाकल्यानंतर, आता त्यांनी आपला मोर्चा चंदन तस्कराकडे वळवला आहे. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध चंदन तस्करी होत असल्याची माहिती हाती येताच, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने 68 किलो चंदनाच्या झाडाचा गाभा आणि त्या चंदनाच्या लाकडांना अवैध वाहतूक करण्यासाठी उपयोगात येणारे वाहन असा एकूण 11 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याकरिता सुचित केले आहे. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला दि. 18 डिसेंबर ते 19 डिसेंबर रोजी मध्यरात्री पथकाला मिळालेल्या माहितीवरून आष्टामोड परिसरात चंदनाच्या लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्या लहान टेम्पोला पकडण्यात आले.
सदरच्या लेलँड कंपनीच्या दोस्त टेम्पो च्या संरचनेत फेरबदल करून एक गोपनीय कप्पा तयार करून त्यामध्ये प्रतिबंधीत व संरक्षित चंदन वृक्षाची लाकुड चोरी करुन चोरटी विक्री करण्यासाठी घेवुन असताना सदर पथकाने सापळा लावून सदरचा लेलँड कंपनीचा दोस्त टेम्पो (क्रमांक एम एच 44 यू 3306) ची पाहणी केली असता, त्यामधील पुष्पा स्टाईलने त्या टेम्पोमध्ये गोपनीय कप्प्यामध्ये वृक्षतोड करण्यासाठी प्रतिबंधित व संरक्षित चंदनाची साल काढून तासलेला चंदनाचा गाभा व लाकडे मिळून आली.
सदरचे वाहन चालविणारे चालक व मालक हे अंधाराच्या फायदा घेऊन प्रसार झाले आहेत, नमूद आरोपींना निष्पन्न करून त्यांना ताब्यात घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
पळून गेलेल्या आरोपी च्या ताब्यातील वाहनांमधून 68 किलो चंदन, लेलँड कंपनीचे दोस्त नावाचे टेम्पो असा एकूण 11 लाख 22 हजार 800 रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस ठाणे चाकूर येथे नमूद आरोपी विरुद्ध कलम 41,42 भारतीय वन अधिनियम 1927 व 4 महाराष्ट्र वृक्ष तोड अधिनियम, 303(2),3 (5) भारतीय न्याय संहिता प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड यांचे नेतृत्वात पोलीस अमलदार चंद्रकांत डांगे, रामहरी भोसले, युवराज गिरी, अर्जुन राजपूत, सिद्धेश्वर मदने, गोविंद भोसले यांनी केली आहे.