ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध गुटखा जप्त
उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखू परराज्यातून मोठ्या प्रमाणात उदगीर शहरात आणि येथून इतरत्र वितरित होण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. गेल्या अनेक दिवसात उदगीर परिसरात मोठ्या धडीही टाकण्यात आल्या आहेत. या सर्व गोष्टीवरून उदगीर शहर हे अवैध गुटखा विक्रीचे केंद्र बनते की काय? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.
वरिष्ठ अधिकारी चिरीमिरी च्या नादात अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत, त्यामुळे अवैध धंदे फोफाऊ लागले आहेत. अशातच उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यामुळे ग्रामीण पोलिसांच्या या पथकाने वळण रस्त्यावर सापळा रचून 18 लाख 66 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे. ज्या मध्यें गुटखा आणि त्याचे वाहतूक करणारी गाडीचा समावेश आहे.
याबाबत पोलिसांकडून हाती आलेली माहिती अशी की, रविवारी रात्री सव्वा 11 ते 11:30 वाजण्याच्या सुमारास कर्नाटक राज्यातून अवैध गुटखा वाहतूक करणारी एक जीप उदगीर शहराकडे येत असल्याची टीप मिळाली. या बातमीच्या आधारे वळण रस्त्यावरील संगमेश्वर मंगल कार्यालयाजवळ सापळा रचून गुप्त बातमीदारांच्या माहितीप्रमाणे इनोव्हा (क्रमांक एम एच 25 डब्ल्यू 1011) गाडीची तपासणी केली असता, त्यात दहा बोरी विमल पान मसाला, एका बोरीमध्ये चार बॅग अशा एकूण 40 बॅग आणि एका बॅगेत 52 पुडे असे एकूण 280 पुढे प्रत्येक पुड्याची किंमत 140 प्रमाणे दोन लाख 91 हजार दोनशे रुपये चा माल तसेच दोन बोरी विमल त्या प्रत्येक बोरीत चार बॅग आशा 39 बॅग एका बॅगेमध्ये 52 पुडे असे एकूण 280 पुडे प्रत्येक पुड्याची किंमत 30 रुपये प्रमाणे 62,400 रुपयांचा माल तसेच दोन खपटी बॉक्स ज्यामध्ये रजनीगंधा पानमसाला नावाचे प्रत्येक बॉक्समध्ये 75 छोटे डबे त्यामध्ये प्रत्येक बॉक्समध्ये एकूण 150 डबे असा एकूण 300 डबे प्रत्येक डब्याची किंमत 450 रुपये प्रमाणे असे एकूण 35 हजार रुपयांचा माल तसेच पाच बाबा नवरत्नचे खपटी बॉक्स त्या बॉक्स प्रत्येकी बॉक्समध्ये 15 छोटे बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये दहा डबे असे एकूण 150 डबे पाच बॉक्स मध्ये सातशे पन्नास डबे असे एकूण किंमत दोन लाख दहा हजार रुपयाचा माल तसेच एक खपटी बॉक्स मध्ये बाबा नवरत्न पान मसाला 1050 ग्रामचे बारा डबे प्रत्येक डबा किंमत 2500 प्रमाणे एकूण किंमत तीस हजार रुपये चा माल तसेच एक खपटी बॉक्समध्ये बाबा ५०० ग्रॅम वजनाचे चोवीस डबे प्रत्येक डबा किंमत 1555 प्रमाणे एकूण किंमत 38 हजार 40 रुपये, इनोव्हा कंपनीची सिल्वर कलरची कार किंमत अकरा लाख रुपये अंदाजे असा एकूण 18 लाख 66 हजार 640 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याप्रकरणी पोलीस जमादार नामदेव चेवले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी इमरान अमीर साब शेख (रा. केशवनगर लातूर) यास अटक करण्यात आली आहे. या तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक सुनील भिसे, नाना शिंदे, राजू डबेटवार, अभिजीत लोखंडे, राजकुमार देवडे यांचा समावेश होता.