मंत्रीपद नाही ही खंत झुगारून, विकासपुरुष निघाले विकासाच्या मोहिमेवर !
उदगीर (एल. पी. उगीले) सतत विकासाचा ध्यास घेऊन गेल्या पाच वर्षात उदगीर विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करत असताना, जवळपास साडेसहा हजार कोटी विकास निधी खेचून आणणारा विकास पुरुष विद्यमान आमदार संजय भाऊ बनसोडे यांना चांगले मंत्रीपद मिळेल, अशी अपेक्षा उदगीरच्या जनतेला होती. ते मंत्री तर होणारच मात्र चांगले खाते मिळावे, अशी अपेक्षा उदगीर विधानसभा मतदार संघातील जनतेने जवळपास एक लाखाचे मताधिक्य देऊन, उदगीर विधानसभा मतदारसंघात ऐतिहासिक मतदान केले. मात्र उदगीरच्या दुर्दैवाने मंत्रीपदाने हुलकावणी दिली. याची प्रचंड नाराजी उदगीर विधानसभा मतदारसंघातील सर्वच कार्यकर्त्यांना आहे. मात्र पद येते, जाते, आपण जनतेच्या सेवेमध्ये सदैव तत्पर राहिले पाहिजे. अशा पद्धतीचा आदर्श विचार घेऊन सतत विकासाचा ध्यास घेतलेले लोकप्रतिनिधी उदगीर विधानसभा मतदारसंघाला लाभले आहेत. हे उदगीरकरांचे भाग्यच म्हणावे लागेल.
सामान्यतः मंत्रीपद नाही म्हणून अनेक मोठमोठे नेते मंडळी पक्षावर आणि एकूण कामकाजावर नाराज आहेत. मात्र विकास पुरुष आमदार संजय भाऊ बनसोडे यांनी ती खंत झुगारून देऊन आपण जनसेवा केलीच पाहिजे, ही बांधिलकी स्वीकारत विकासाचा दुसरा टप्पा पूर्ण करण्याचा ध्यास घेऊन ते पुन्हा कामाला लागले आहेत! त्या माणसाची धडाडी, आणि हिम्मत पाहून कार्यकर्त्यांनी देखील आपली नाराजी आणि खंत बाजूला ठेवून विकास पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून विकासाच्या यात्रेत सहभागी व्हायचा निर्धार केला आहे.
मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर कित्येक जुने मंत्री आपली मंत्री पदाची संधी हूकली म्हणून आपल्या पक्षावर आणि नेत्यावर आपली नाराजी व्यक्त करत, वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यात मग्न असताना, विकासपुरुष संजय भाऊ बनसोडे यांनी मात्र आपापल्या पद्धतीने उदगीरच्या विकासाचा दुसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी मंत्री असताना मंजूर करून ठेवलेली आणि ज्यांना थोडासा पाठपुरावा केला तर जी कामे मंजूर होऊ शकतात, त्या कामासाठी धडपड करायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून उदगीर शहरातील वाहतुकीचा विचार करून जो आराखडा त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे सोपवला होता. त्या शहराबाहेरील रिंग रोड आणि उदगीर ते देगलूर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. या दोन्ही रस्त्यांच्या कामाला तात्काळ सुरुवात करावी, अशी विनंती त्यांनी ना.नितीन गडकरी यांच्याकडे केल्यानंतर ना. नितीन गडकरी यांनी संबंधितांना सदरील कामे तात्काळ सुरू करावीत. अशा पद्धतीचे आदेश दिले आहेत. तत्कालीन मंत्री तथा विद्यमान आमदार संजय भाऊ बनसोडे यांनी या रस्त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून मंजुरी घेतली आहे. 140 कोटीचा रिंग रोड आणि उदगीर देगलूर रावी मार्गे होणारा रस्त्यासाठी 810 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात आता लवकरच होईल या दृष्टीने संजय भाऊ बनसोडे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून विनंती केली आहे, आणि सुदैवाने नितीन गडकरी यांनी त्या कामाला हिरवा कंदील दाखवला असून लवकरच ही कामे सुरू होणार आहेत.
उदगीर शहरे महाराष्ट्र, कर्नाटका, तेलंगणा, आंध्रा या चार राज्याच्या सीमेवर असल्यामुळे या भागात मोठी रहदारी व वाहतूक असते. या भागातील मोठ्या बाजारपेठेमुळे उदगीर येथे देगलूर, निजामाबाद, मुक्रमाबाद, मरखेल, बिलोली, मुखेड, रावी, हळणी, करडखेल व इतर भागातून नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असायची. मात्र गेल्या काही वर्षापासून देगलूर ते उदगीर ये जा करण्यासाठी एक पदरी रस्ता असल्याने वाहनधारकांना मोठी अडचण निर्माण होत होती. नागरिकांची ही गैरसोय विचारात घेऊन तत्कालीन क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा विद्यमान आमदार संजय भाऊ बनसोडे यांनी जनतेची ही अडचण दूर करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे हट्ट धरला आहे, आणि लवकरच या दोन्ही रस्त्यांच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती संजय भाऊ बनसोडे यांनी दिली आहे.
आपण कायम उदगीर विधानसभा मतदारसंघाच्या विकासाला बांधील राहून जनतेने जे प्रेम दिले आहे, त्या प्रेमाची उत्तराई करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करून उदगीर विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रामध्ये विकासाचे मॉडेल बनवणारच, असा निर्धार आ.संजयभाऊ बनसोडे यांनी केला आहे.
मराठवाड्यामध्ये सर्वात दर्जेदार अशा पद्धतीचे भुयारी गटार योजना उदगीर शहरांमध्ये सुरू होत आहे. त्या दृष्टीनेही त्यांनी केलेले प्रयत्न लाख मोलाचे आहेत. उदगीर शहरामध्ये भुयारी गटार योजना सुरू व्हावी, यासाठी 480 करोड रुपयांच्या खर्चाचा आराखडा त्यांनी मंजूर करून घेतला आहे. त्या उदगीर शहर भुयारी गटार योजनेचा पहिला टप्पा 162 कोटी रुपयांच्या कामाचा भूमिपूजन सोहळा 28 डिसेंबर 2024 रोजी संपन्न होतो आहे. विकासाची ही झेप विकास पुरुषच घेऊ शकतात !!
याची खात्री आता उदगीरकरांना झाली आहे. त्यासाठी उदगीर विधानसभा मतदार संघांतील जनतेने आपल्या प्रतिनिधीवर अफाट प्रेम करत, एक लाखाच्या जवळपास मताधिक्य दिले आहे.
वेगवेगळ्या माध्यमातून निधी कसा खेचून आणायचा? हे नवीन आमदारांनी संजय भाऊ बनसोडे यांच्याकडून शिकावे. असे म्हटले तर वावगे होणार नाही. वेगवेगळ्या विभागातून वेगवेगळी कामे मंजूर करून घेऊन त्या कामातून आपल्या विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याची किमया विकास पुरुष संजय भाऊ बनसोडे यांनी केली आहे.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तरीय) अंतर्गत उदगीर शहर भुयारी गटार योजना त्यांनी मंजूर करून घेतली आहे. ही योजना उदगीर शहरातील जनतेच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण भुयारी गटार योजना मुळे साथीचे रोग असतील किंवा दुर्गंधीचा त्रास असेल हे सर्व आता थांबणार आहे. आपल्या जनतेच्या हिताचा आणि आरोग्याचा सतत विचार करत आमदार संजय बनसोडे नवीन नवीन योजना प्रत्यक्ष राबवून आपण जनसेवेसाठी किती तत्पर आहोत. हे दाखवून देत आहेत. त्यांनी केलेल्या विकास कामाची यादी सांगायची झाल्यास स्वतंत्रपणे त्याचे पुस्तकच बनवावे लागेल. आभाळाला गवसणी घालणाऱ्या या नेतृत्वाला विकासाची झेप घेण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी आणखी बळ द्यावे, आणि त्यांच्या दूरदृष्टी आणि विकास करण्याची क्षमता विचारात घेऊन त्यांना संधी द्यावी. अशी अपेक्षा सर्व नागरिकांची आहे.
सामाजिक समतोल आणि विभागनिहाय समतोल साधत असताना काही तडजोडी राजकीय पक्षांना कराव्या लागल्या असतील, मात्र त्यामुळे उदगीर विधानसभा मतदारसंघाच्या विकासाला काही प्रमाणात खीळ बसते की काय? अशी शंका काही लोकांच्या मनात निर्माण होत होती. परंतु परिस्थितीवर मात करत आपले वेगळे अस्तित्व जपणे आणि आपल्यावर प्रेम करणाऱ्या जनतेच्या विकासाचा विचार करून नवीन नवीन योजना प्रत्यक्ष उतरवून आपल्या भागाचा विकास करणे, हाच ध्यास ज्या माणसाने कायमस्वरूपी बाळगला आहे. त्या माणसाच्या विकास कामांना सलाम !!
चौकट…..
भारताचे माजी पंतप्रधान तथा अर्थतज्ञ मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे 27 डिसेंबर रोजी होणारे उद्घाटन रद्द करून ते उद्घाटन 28 डिसेंबर रोजी होणार आहे असे नगर अभियंता सुनील कटके यांनी कळवले आहे.