डोळ्यात मिरची पूड टाकून 26 तोळे सोन्याचे दागिने लुटीचे नाटक !!एलसीबी आणि ग्रामीण पोलिसांनी तपास करून, बनाव करणारा व्यापारी केला अटक !!
लातूर (एल.पी.उगीले) आपण सोन्या चांदीचे दागिने ग्राहकाला दाखवण्यासाठी गेलो असता, वाटेत अज्ञात चोरट्यांनी आपल्याला अडवले आणि आपल्या ताब्यातील 26 तोळे सोन्याचे दागिने लुटून नेले. अशा पद्धतीचे तक्रार एका व्यापाऱ्याने लातूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दिली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात वाटणारी करून लूट झाल्याची गंभीर घटना विचारात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या संदर्भात लातूर ग्रामीण पोलिसांच्या सोबतच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले आणि त्यांच्या पथकाला समांतर तपास करण्याच्या सूचना केल्या होत्या. गुन्ह्याचे गांभीर्य विचारात घेऊन लातूर ग्रामीण पोलिसांनी ज्येष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून तपासाला सुरुवात केली. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपासाला गती दिलीच होती. वेगवेगळ्या पद्धतीने तपास केल्यानंतर अशा पद्धतीची घटना घडलीच नसावी. अशी खात्री झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि लातूर ग्रामीणच्या विशेष पथकाने उलट तपासणी करण्याच्या दृष्टीने तक्रारदार व्यापाऱ्यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, गुन्ह्याचे नाटक केल्याचे उघड झाले.
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, दिनांक 23/12/2024 रोजी सायंकाळी सात वाजण्याचे सुमारास लातूर येथील सराफा व्यापारी अमर अंबादास साळुंके (वय 31 वर्ष, रा. पोचम्मा गल्ली ,लातूर) यांनी पोलीस ठाणे लातूर ग्रामीण येथे तक्रार केली की, दिनांक 23/12/2024 रोजी सायंकाळी सराफ लाईन, लातूर येथील एका दुकानातून 20 लाख 46 हजार रुपये किमतीचे 26 तोळे सोन्याचे दागिने त्याचे स्कुटी गाडीच्या डिक्की मध्ये घेऊन नेहमीप्रमाणे गिर्हाईकांना दाखविण्यासाठी रेनापुर येथे गेलो होतो. तेथून परत येत असताना सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास रेनापुर ते लातूर जाणारे रोडवरील कातळे नगर,जवळ मोटर सायकल वरून आलेल्या दोन अज्ञान व्यक्तीने माझ्या डोळ्यात मिरची पूड टाकून माझ्या गाडीतील 26 तोळे सोन्याचे दागिने चोरून घेऊन पळून गेले आहेत. अशी तक्रार केली. सदर तक्रारीचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे सूचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर ग्रामीण बि.चंद्रकांत रेड्डी यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे लातूर ग्रामीणचे अधिकारी, अमलदारांचे पथके तयार करून मार्गदर्शन करून तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आले.
वास्तविक पाहता लातूर ग्रामीण पोलिसांच्या कर्तबदारीमुळे संध्याकाळच्या वेळेस अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची शक्यता पोलिसांना वाटत नव्हती. व्यापाऱ्याने हुबेहूब नाटक केले होते. सोन्याचे दागिने रेनापुरला निघून व्यापाऱ्याला दाखविले होते. मात्र डोळ्यात मिरचीची पूड टाकून लूट झाल्याचे सांगत असले तरी घटनास्थळावर तसे कोणते चिन्ह आढळून येत नसल्याने पोलिसांच्या डोक्यात संशयाची पाल चुकचूकली.
सदर पथकांनी तात्काळ घटनास्थळा वर पोहोचून घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. तसेच तक्रारदार अमर अंबादास साळुंके याचे कडे कुशलतेने विचारपूस केली. घडलेली घटना व अमर साळुंके सांगत असलेल्या हकीकत मध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती दिसून येत होत्या. त्यावरून पथकाने अमर साळुंके यास विश्वासात घेऊन विचारपूस केली तेव्हा त्याने सांगितले की, मला लोकांचे पैसे देणे झाल्याने सदरचे दागिने चोरी गेल्याचा बनाव करून त्यामधून माझा आर्थिक फायदा करून घेण्यासाठी चोरीचा बनाव केल्याचे कबूल केले. तसेच त्याने रेणापूर ते लातूर कडे येणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या एका शेतामध्ये खड्डा करून लपवून ठेवलेले 20 लाख 46 हजार रुपयांचे 26 तोळ्याचे दागिने काढून दिल्याने ते पोलिसांनी हस्तगत केले आहे.
डोळ्यात मिरची पूड घालून सोन्याचे दागिने लुटीचा बनाव करून पोलिसांना खोटी तक्रार दिल्याच्या कारणावरून अमर अंबादास साळुंके (वय 31 वर्ष, (सोने चांदीचे व्यापारी) रा. पोचमा गल्ली, लातूर) याचे विरुद्ध पोलीस ठाणे लातूर ग्रामीणचे ठाणे अंमलदार लक्ष्मण धर्माजी कुंभरे त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वरिष्ठांचे मार्गदर्शनात पथकांनी अतिशय कुशलतेने सदर घटनेचा तपास करून सदरची घटना ही खोटी असून बनवाबनवी केल्याचे निष्पन्न करून तक्रारदाराकडूनच 20 लाख 46 हजार रुपयांचे 26 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांचे व उपविभागीय पोलीस अधिकारी,चाकूर चार्ज लातूर ग्रामीण बी. चंद्रकांत रेड्डी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड ,पोलीस अंमलदार मोहन सुरवसे, प्रदीप स्वामी,नितीन कठारे, मनोज खोसे, सचिन मुंडे, तसेच पोलीस ठाणे लातूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार ,पोलीस उपनिरीक्षक मोरे, पोलीस अंमलदार चौगुले, चंद्रपाटले, दरोडे यांनी केली आहे.
पोलिसांना वेड्यात काढून चोरीचा बनाव करणाऱ्या व्यापाऱ्यांचे पितळ उघडे पडल्याने पोलिसांच्या या तपास पद्धतीबद्दल जनतेमधून लातूर ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अभिनंदन केले जात आहे.