पुस्तक हेच ज्ञान मिळविण्याचे परिपूर्ण साधन – कथाकार अंबादास केदार
उदगीर : (एल.पी.उगीले) ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर पुस्तकाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे अभ्यासक्रमाव्यतिरिक्त पुस्तके वाचली पाहिजेत. पुस्तक हेच ज्ञान मिळविण्याचे परिपूर्ण साधन आहे, असे मत देऊळवाडी येथील कथाकार अंबादास केदार यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमांतर्गत ‘लेखक-वाचक संवाद’ कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के हे होते.
पुढे बोलताना अंबादास केदार म्हणाले, कादंबरी, नाटक, आत्मचरित्र यासारखे विविध साहित्यप्रकार विद्यार्थ्यांनी वाचले पाहिजेत. विद्यार्थ्यांनी मोबाईलचे व्यसनाधीन न होता, पुस्तकांचे वाचनाधीन व्हावे, असे आवाहन उपस्थितांना केले. अध्यक्षीय समारोप करताना डॉ. मस्के म्हणाले, ध्येयाचा सूर्य मावळू नये यासाठी प्रयत्नवादी व ध्येयवादी बना. संघर्षाची पराकाष्टा केल्याशिवाय यशाचे शिखर गाठता येत नाही. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने विद्यार्थी दशेत अभ्यासाचा ध्यास घ्यावा, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ग्रंथपाल डॉ. लक्ष्मीकांत पेन्सलवार यांनी तर आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. बालाजी होकरणे यांनी मानले.