जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांनी घेतला तंबाखू नियंत्रण समिती कामाचा आढावा
लातूर (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची आढावा बैठक सोमवारी झाली. या बैठकीमध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत वर्षभरातील विविध उपक्रमांचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला. तसेच मौखिक आरोग्य कार्यक्रमाचाही सविस्तर आढावा घेण्यात आला.
जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये व कार्यालयीन परिसर तंबाखू मुक्त ठेवण्यासाठी सर्व कार्यालय प्रमुख यांनी कोटपा 2003 कायद्यानुसार दंडात्मक कार्यवाही करावी, असे आदेश दिले. तसेच जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त करून शालेय विद्यार्थी यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी शालेय प्रशासनाने प्रयत्नशील राहावे. जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त करण्याच्या सूचना शिक्षण अधिकारी व शिक्षण विभाग यांना दिल्या.
या बैठकीला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ए. जे. तडवी, पोलीस उपाधिक्षक गजानन भातलवंडे, अन्न व औषधी विभाग सहाय्यक आयुक्त प्रशांत काकडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे ,वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. शंकर भारती, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक सारडा, डॉ आनंद कलमे तसेच सर्व तालुका स्तरीय गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.