मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्याविरुद्ध उदगीर मध्ये गुन्हा दाखल
उदगीर (प्रतिनिधी) : सकल ओबीसी समाजाच्या वतीने बीड येथील घटनेच्या अनुषंगाने वेळोवेळी निवेदने देऊन, संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. असे असताना देखील सकल ओबीसी समाजाची अस्मिता आणि वंजारी समाजाचे नेते राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. धनंजय मुंडे, ना.पंकजा मुंडे आणि बीड जिल्ह्यातील वंजारी समाजाचे नेते, अधिकारी यांच्या विरोधात हेतूत: अवमानजनक शब्द वापरून बदनामी करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. या अनुषंगाने उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया या दोघांच्या विरोधामध्ये दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील फिर्यादीमध्ये गोविंद नरहरी घुगे यांनी नमूद केले आहे की, वेळोवेळी मनोज जरांगे पाटील यांनी वंजारी समाजाचे नेते व समाजाला शिवीगाळ करून नेत्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन जाहीर सभेत जातीय तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केले आहे. वंजारी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. म्हणून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सकल ओबीसी समाजाच्या वतीने करण्यात आली होती. इतकेच नाही तर 4 जानेवारी 2025 रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास जाहीर सभेमध्ये मनोज जरांजे पाटील यांनी राजकीय हेतूने जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने वंजारी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. समाजामध्ये अशा पद्धतीच्या वक्तव्यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊन शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जात आहे.
बीड जिल्ह्यात संतोष देशमुख यांची जी हत्या झाली ती अतिशय वाईट घटना आहे. त्यातील दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. मात्र या घटनेच्या आडून मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया हे लोक वंजारी समाजाबाबत तसेच वंजारी समाजाचे मंत्री ना. धनंजय मुंडे, ना. पंकजाताई मुंडे तसेच समाजातील अधिकारी व कर्मचारी व एकूण वंजारी समाजबाबत जातीवाचक बोलून शिवेगाळ करत आहेत. तसेच जीवे मारण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची तक्रार सदरील फिर्यादीमध्ये गोविंद नरहरी घुगे यांनी दिली आहे.
सदरील फिर्यादीची दखल घेऊन उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गु.र.न. 29/ 25 कलम 352,351( 2), 351(3), 3( 5) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्येष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.
चौकट…..
धनंजय मुंडे च्या विरोधातही निवेदन
फक्त बीड जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडणाऱ्या संतोष देशमुख यांच्या क्रूर आणि अमानुष खुनाच्या कटाचा खरा सूत्रधार यास तात्काळ अटक करावी, आणि त्याची कसून चौकशी केली जावी. यासोबतच महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून अर्धचंद्र दिला जावा, या उद्देशाने सकल मराठा समाजाच्या वतीने उदगीर तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनाला निवेदन पाठवण्यात आले आहे.
सदरील निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपींना फाशी देण्यात यावी, व माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या काळात लातूर जिल्ह्यातील झालेल्या कथित पिक विमा घोटाळ्याची सखोल चौकशी केली जावी. व दोषींना तात्काळ अटक करावी. अशी मागणी केली आहे. सदरील निवेदनावर शिवाजीराव भोळे, बाळासाहेब पाटोदे, बाबासाहेब सूर्यवंशी, सतीश पाटील, व्यंकटराव पाटील, शिवाजीराव बिरादार, रोहिदास मिरकले, वेंकोने सुधाकर, छकुल जाधव, व्यंकट मगर, संग्राम पताळे, बालाजी भालेराव, डॉ. निवृत्ती तीरकमटे, गोविंद बिरादार, गिरीधर पाटील, दीपक पाटील, देवानंद बिरादार, संदीप पाटील, सुनील पाटील, तुकाराम गुणाजी मोटे, संग्राम यादवराव पाटील, विशाल दाडगे, गणेश बिरादार, महेश माने, तुकाराम बिरादार, मारुती बिरादार, सुभाष बिरादार, अंकुश बामणे, राम मोटे इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.