बस व मोटरसायकल अपघातात युवकाचा जागीच मृत्यू…!
अहमदपूर (गोविंद काळे) : दि.९ तालुक्यातील ढाळेगाव येथील महावीर विश्वनाथ गुंठे या ३५वर्षीय युवकाचा आज सकाळी साधारणतः८:००वाजता ढाळेगाव – खंडाळी रोडवर एस टी बसला अपघात होऊन जागीच मृत्यू झाला.
सविस्तर वृत्त असे की, सकाळी साधारणतः ०८:०० वाजता चाकूर – परभणी जाणारी बस व्हाया किनगाव -अंधोरी – ढाळेगाव – खंडाळी मार्गे जात असताना ढाळेगाव पासून अगदी पाचशे मीटर अंतरावर खंडाळी रोडवर महावीर गुंठे यांच्या मोटरसायकल चा व गंगाखेड आगाराची बस क्रमांक एम एच २० बी एल १७७८ चा अपघात झाला. महावीर गुंठे हा अल्पभूधारक युवा शेतकरी होता तो सकाळी शेतातून घरी परतत होता रस्ता हा एकेरी वाहतुकीचा असून रोडच्या दोन्ही बाजूस ओ एफ सी केबल टाकण्यासाठी खोदकाम करून थातूर मातूर बुजवण्यात आले होते. समोरून बस आल्याने महावीर गुंठे यांना रोडच्या खाली खड्ड्यांमुळे मोटरसायकल घेता आली नाही आणि अशातच समोरासमोर अपघात झाला असावा असा गावकऱ्यांचा अंदाज आहे.अपघात एवढा भीषण होता की महावीर गुंटे यांच्या मोटरसायकलचा चंदामेंदा तर झालाच मात्र एस टी बसच्या वाहकाच्या बाजूने एसटीचा पत्राही दबून तुटला महावीर गुंठे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने डोके फुटून रक्ताचे शिंतोडे बसच्या समोरील भागावर पडल्याने सर्वत्र रक्त पसरले होते, या घटनेची माहिती मिळताच किनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी सुनील श्रीरामे व सोनवणे यांनी घटनास्थळी येऊन घटनास्थळाचा पंचनामा करून महावीर गुंटे यांचे प्रेत सेवाविच्छेदनासाठी प्राथमिक रुग्णालय अंधोरी येथे पाठवून दिले, त्याचबरोबर अहमदपूर आगाराचे आगार प्रमुख देशमुख यांनीही घटनास्थळास भेट देऊन अपघात ग्रस्त बस किनगाव पोलीस स्टेशनला पाठवून दिली. सदरील घटनेचा गुन्हा नोंदवण्याचे काम किनगाव पोलीस स्टेशनला सुरू होते.
महावीर गुंठे हे शेतीबरोबरच प्राणिमित्र व सर्पमित्र म्हणून परिचित असल्याने त्यांच्या अपघाती मृत्युचे वृत समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.