प्राचीन संस्कृती व अर्वाचीन उद्योगाचा अभ्यास करून महात्मा फुले महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी काढले निष्कर्ष
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाने दक्षिण भारतातील विजयपूर, (किश्किंदा, हंपी) दक्षिण भारतातील इतर ऐतिहासिक स्थळांची अभ्यास अभियान मोहीम काढून ७०० वर्षांपूर्वीचे दगडी बांधकाम तर आधुनिक काळातील वेस्ट कोस्ट कागदी या कारखान्याचा डोळस अभ्यास करून हाती आलेले महत्त्वाचे निष्कर्ष नोंदवून ते केंद्र व कर्नाटक सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याची प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील व माहिती सहल प्रमुख डॉ.किरण गुट्टे यांनी दिली.
आपल्या प्रयोगशीलतेमुळे व उपक्रमशीलतेमुळे मराठवाड्याच्या शैक्षणिक वर्तुळात प्रसिद्ध असलेल्या किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती .ही दक्षिण भारत अभ्यास मोहीम चिकित्सकपणे प्राचीन काळातील वातावरणात डोकावत डोळसपणे यशस्वी झाली आहे.
महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने विविध प्रकारच्या अभ्यास सहलींचे आयोजन करण्यात येते, त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी महाविद्यालयातील कर्मचारी व प्राध्यापकांची दक्षिण भारत अभ्यास मोहीम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती. दि. २ ते ६ जानेवारी या कालावधीत ही मोहीम पार पडली. प्राचार्यांनी हिरवा झेंडा दाखवून या अभ्यास मोहिमेला सुरुवात केली. अहमदपूर, लातूर, सोलापूर मार्गे कर्नाटकातील विजापूर या शहराला भेट देण्यात आली. तेथील सुप्रसिद्ध ३५० वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक’गोल घुमट’ या इमारतीचा मोहिमेतील प्राध्यापकांनी तत्कालीन अभियंत्याच्या कौशल्याचा अभ्यास केला. ‘गोल घुमट’ इमारत म्हणजे आदिलशाही राजवटीतील स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना आहे .विजापूर शहरातील वस्तू संग्रहालयाला भेट देण्यात आली. तेथील वैविध्यतेची चिकित्सा करून निष्कर्ष काढले गेले. येथेच महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या वतीने प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
त्यानंतर कर्नाटकातील होस्पेट येथे विजयनगर महाविद्यालयामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती तेथील प्राचार्य डॉ. एम. प्रभगौडा यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात येऊन दक्षिण भारतातील शिक्षण व्यवस्थेचा अभ्यास करून महाराष्ट्राची शैक्षणिक स्थिती व गतीचा तौलनिक अभ्यास करण्यात आला. तसेच रामायण कालीन किष्किंदा नगरी अर्थात हम्पी नावाने परिचित असलेल्या कृष्णदेवराय यांची राजधानी विजयनगर या प्राचीन नगराला भेट देण्यात आली. तेथील श्री विठ्ठल मंदिर, विरूपाक्ष मंदिर, अंजनेरी पर्वत, मातंग पर्वत आदी ठिकाणांनाही भेटी देण्यात आल्या. प्राचीन काळातील दगडी बांधकामाचे प्राचीन व अर्वाचीन दृष्टीने चिकित्सा करण्यात आली. तसेच परिसरातील सुंदर निसर्गाने सर्वांचे मन मोहून टाकले.
त्यानंतर हुबळी मार्गे गोकर्ण, मुरुडेश्वर आणि दांडेली या ठिकाणी भेटी देण्यात आल्या. दांडेली येथील काली नदीच्या विस्तीर्ण पात्रात बोटिंगचाही अनुभव घेतला. दांडेली येथील ७० वर्षांपूर्वीचा वेस्ट कोस्ट या १९५५ मध्ये अस्तित्वात आलेल्या कागद कारखान्यालाही अभ्यासकांनी भेट दिली. तेव्हाच्या कागद निर्मिती मध्ये व आताच्या कागद निर्मितीची तुलना व दर्जाचा चर्चा करून निष्कर्ष काढले.परतीच्या मार्गात बेळगावला भेट देऊन येथे गुरु गोविंद सिंग व ज्येष्ठ साहित्यिक विजय तेंडुलकर यांची जयंती साजरी करण्यात आली. पंढरपूर, तुळजापूर येथील देवस्थानांना अभ्यासपूर्ण भेटी देत या अभ्यास मोहीमेचा समारोप महात्मा फुले महाविद्यालयात करण्यात आला.
या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व प्राध्यापकांनी दक्षिण भारतातील विविध ठिकाणांना भेटी देऊन सांगोपांग अभ्यास केला असून, या मोहिमेतील अभ्यासावर आधारित लेखन आणि संशोधनाच्या संदर्भ ग्रंथाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. तर केंद्र व कर्नाटक सरकारकडे काढण्यात आलेले निष्कर्ष पाठवून देण्यात येणार असल्याची माहिती सहल प्रमुख डॉ. किरण गुट्टे यांनी दिली.तर दक्षिण भारताची अभ्यास मोहीम यशस्वी केल्याबद्दल प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, सर्व सहभागी प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर, उपाध्यक्ष माधवराव पाटील, सचिव पी. टी. शिंदे तसेच सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.