पशुसखींनी शेळीपालनात प्रयोगशील असावे – प्रा. डॉ. नंदकुमार गायकवाड
उदगीर (एल.पी.उगीले) : प्रशिक्षणातून शेळीपालनाचे विविध तंत्रज्ञान पशुसखींनी आत्मसात केलेले आहे. प्राप्त माहिती व नवतंत्राचा गोठ्यात प्रत्यक्ष प्रयोग पशुसखींनी करून संशोधक दृष्टीने त्याची चिकित्सा करावी, असे अध्यक्षीय समारोपात पशुवैद्यक महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. नंदकुमार गायकवाड यांनी प्रतिपादित केले.
याप्रसंगी मंचावर प्रमुख अतिथि म्हणून नसिरूल इस्लाम, मूल्य-साखळी सल्लागार, माविम, मुंबई, उत्कर्ष भोळे, विभागीय व्यावसायिक सल्लागार लातूर, सौ. शोभा कुलकर्णी, जिल्हा समन्वय अधिकारी, धाराशिव, मन्सूर पटेल, जिल्हा समन्वय अधिकारी लातूर, प्रकल्प सह-समन्वयक डॉ. नरेंद्र खोडे आणि प्रशिक्षण समन्वयक डॉ. शरद आव्हाड हे उपस्थित होते.
डॉ गायकवाड पुढे म्हणाले की, खनिज मिश्रण, समतोल आहार, जंताचे औषध अशा विविध तंत्राचा शेळया-करडांत उपयोग करुन त्यामुळे आरोग्य, वजन, उत्पादन आणि प्रजोत्पादनात झालेले बदल चौकसपणे तपासावे. त्याकरिता पशुसखींनी शेळीपालनात प्रयोगशील होणे आवश्यक आहे. त्यामुळे नवतंत्राबाबत असलेली साशंकता कमी होईल आणि अवलंब वाढेल.
प्रशिक्षण श्रुंखलेतील हे दुसरे प्रशिक्षण दि. ०६ ते १० जानेवारी २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आले होते. धाराशिव जिल्ह्यातील १७ पशुसखी महिलांनी यात हिरीरीने सहभाग घेतला. डॉ. नरेंद्र खोडे यांनी प्रास्ताविकात आयोजित प्रशिक्षणाचा एकंदरीत आढावा प्रस्तुत केला. डॉ. शरद आव्हाड यांनी सूत्रसंचालन केले.
शेळीपालनाला मुल्यवर्धनाची जोड दिल्यास अधिक अर्थप्राप्ती होईल आणि उपजिविकेचा एक शाश्वत मार्ग मिळेल असा विश्वास नसिरूल इस्लाम यांनी प्रकट केला. उत्कर्ष भोळे, विभागीय सल्लागार, डॉ. धनंजय देशमुख, प्रकल्प समन्वयक तसेच सौ. शोभा कुलकर्णी यांनी समयोचित मार्गदर्शने केलीत. मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या पशुसखींना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
शोभा सुतार, वनमाला जगताप, विजया ठोंगे, अनिता पिंपळकर आणि शीतल आव्हाड या पशुसखींनी अभिप्राय व्यक्त केले.
डॉ. अय्यान पाटील यांनी आभार प्रकट केले. डॉ. संकेत नरवाडे, डॉ. सुहासिनी हजारे आणि डॉ. वेदान्त पांडे यांनी प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले. प्रसंगी डॉ मस्यगंधा पाटील, डॉ राम कुलकर्णी, आणि प्रकाश मगर यांचे समवेत महाविद्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.