साधनांसाठी नव्हे,तर कर्तृत्वासाठी संकल्प करा
उदगिर (एल.पी.उगीले) : मनाची एकाग्रता अत्यंत महत्वाची आहे.विचार बदला,कर्म चांगले ठेवा.साधनांसाठी नव्हे तर कर्तृत्वासाठी संकल्प करावा.असा सल्ला प्रसिध्द ब्रम्हाकुमारी शिवानी दीदी यांनी दिला. येथील क्रीडा संकुलाच्या मैदानावर ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या वतीने ‘शांत चित्त आणि आनंदी जीवन’या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.तेंव्हा त्या बोलत होत्या.
कार्यक्रमात शिवानी दीदी म्हणाल्या,विचार सकारात्मक ठेवा मोबाईल हा फोन राहू द्या.त्याला टीव्ही बनवू नका.विचार बदला योग्य कृती करा.जसे अन्न आहे.तसे मन आहे. मनाला शुध्द ठेवण्यासाठी चांगले विचार आवश्यक असतात. दिवसेंदिवस परिवारामध्ये कलह वाढत आहे.मुलामध्ये नकारात्मकता दिसून येत आहे.अशांत मनाचा परिवारावर वाईट परिणाम होतो.त्यामुळे मुलांना परिवारात शांतता हवी असते.मुलांच्या मनाप्रमाणे घरात शांतता निर्माण झाली पाहिजे.यासाठी कुटूंबप्रमुखांनी काळजी घेतली पाहिजे. ताणतणावामुळे मानसिक आणि शारीरिक हानी होत असते.प्रत्येक चांगल्या विचाराला शक्ती बनवले पाहिजे.घराचा मुलांवर प्रभाव असतो, कुणाबद्दल बोलायचे असेल तर चांगले सकारात्मक बोलावे.मनाचा शरीरावर परिणाम होतो,जगताना माणसे सुखी नसतात, सोडून जाताना आनंदी राहायचे असते.परिस्थितीनुसार जगा, संकल्प बदला,नशीब बदलेल,प्रत्येक समस्येवर उपाय असतो.जीवनात दुःखी होऊ नका.मनाची शांती जिथे असेल तिचा शोध घेऊन त्या प्रमाणे वागायला शिकले पाहिजे.युवक व नागरिक सुदृढझ झाले तरच देशाची प्रगती शक्य आहे.असे त्यांनी नमुद केले.या कार्यक्रमास विलास सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा वैशालीताई देशमुख,माजी आमदार गोविंदराव केंद्रे,माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे,उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर,चाकूर बीएसफचे विनीतकुमार दीक्षित,उदगीर केंद्रांच्यासंचालिका महानंदा बहेनजी दीदी उपस्थित होत्या.तसेच मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती.