वाशिम जिल्ह्यातील एक कोटी रुपयांच्या बॅग लुटीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी लातूर स्थानीक गुन्हे शाखेच्या ताब्यात
लातूर (एल.पी.उगीले) : वाशिम जिल्ह्यामधील एका मोठ्या चोरीतून एक कोटी 15 लाख रुपये लुटल्यानंतर, पोलिसापासून लपण्यासाठी चोरट्याने वाशिम जिल्हा सोडून लातूर जिल्ह्यात आश्रय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्तबदारी माहीत नसावी. कारण तो लातूर येथे आल्यानंतर लगेच लातूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने त्याला ताब्यात घेऊन त्याची सर्व माहिती काढली, आणि तो चोरटा आपोआपच पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, दिनांक 10/01/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, वाशिम जिल्ह्यातील वाशिम शहर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या एका गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी औसा रोड वरील एका लग्नकार्यालयाच्या पार्किंग मध्ये थांबलेला आहे.ही माहिती मिळाताच पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात सदर पथकाने तात्काळ सदर ठिकाणी पोहोचून बातमी मधील इसमास ताब्यात घेऊन विचारपूस केली. नमूद इसमाने त्याचे नाव स्वप्निल परसराम पवार, (वय 28 वर्ष, राहणार तोंडगाव, वाशिम) असे असल्याचे सांगून त्याने दिनांक 09/01/2025 रोजी हिंगोली गेट उड्डाणपूल जवळ,वाशिम येथे एका स्कुटी मोटरसायकल चालकास अडवून त्याला रॉडने मारहाण करून त्याच्याकडील 1 कोटी 15 लाख रुपयेची बॅग जबरदस्तीने चोरल्याचे सांगून पोलिसांच्या भितीने वाशिम जिल्ह्याच्या बाहेर पळून आल्याचे सांगितले.
वाशिम जिल्हा पोलिसांशी संपर्क साधला असता पोलीस ठाणे वाशिम शहर गुन्हा क्रमांक 63/25 कलम 309(6), 3 (5) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून नमूद आरोपीस वाशिम स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलिस अमलदार मोहन सुरवसे, युवराज गिरी, अर्जुन राजपूत, दीनानाथ देवकाते, मुन्ना मदने यांनी केली आहे.