माळेगांवच्या पशुप्रदर्शनात शेनकुडची गाय प्रथम
अहमदपूर (गोविंद काळे) : श्रीक्षेत्र माळेगांव येथील शासकीय पशुप्रदर्शनात तालुक्यातील शेनकुड येथील शिवाजी केरबा नरवटे यांची लाल कंधारी जातीची गाय सर्वप्रथम आली असून याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. दक्षिण भारताची सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेली श्रीक्षेत्र माळेगांव येथील खंडोबाचे यात्रेत दरवर्षी जि.प.नांदेडच्या वतीने पशुप्रदर्शन घेण्यात येते. यात राज्यभरातून विविध जातींच्या शेकडो गाई सहभागी होतात. यावर्षीच्या पशुप्रदर्शनात अहमदपूर तालुक्यातील शेनकुड येथील शेतकरी भिवाजी केरबा नरवटे यांच्या लाल कंधारी गायीला प्रथम क्रमांक मिळाला असून 21000 रोख व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. साधारणतः साडेतीन वर्षाच्या या लाल कंधारी जातीच्या गायीला यापूर्वीही अनेक पुरस्कार मिळाले असून या गाईचे मालक भिवाजी नरवटे यांनी ‘या गाईला योग्य आहार आणि निगराणी ठेवल्यानेच हे पुरस्कार मिळाल्याचे सांगितले.’ आ. प्रतापराव चिखलीकर, पशुसंवर्धन अधिकारी घुले, सरपंच हनुमंत धुळगुंडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.