राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र गृहमंत्री नेमावा – मा.आनंदराज आंबेडकर
लातूर (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील सरपंच देशमुख यांची झालेली अमानवी हत्या,परभणीत संविधान प्रेमी कायद्याच्या विद्यार्थ्यांचा पोलिसांनी केलेला खून,या घटना निषेधार्य आहेतच तथापि या सारख्या अनेक घटनांनी महाराष्ट्रातील विविध समाज घटकांमध्ये असंतोष वाढला आहे. तो वाढत जाण्याची शक्यता आहे. म्हणून पोलीस खाते सांभाळण्यास अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात स्वतंत्र गृहमंत्री नेमवा, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी मा.आनंदराज आंबेडकर यांनी लातूर येथील गांधी चौकात पत्रकार परिषदेत बोलताना केली आहे.
मस्साजोग आणि परभणीतील हत्येनंतर राज्यातील सर्व समाज घटकात असंतोष आहे. बीड जिल्ह्यात यापूर्वीही अनेक हत्या झाल्या असून त्या पचविण्यात आल्या. अशा घटना कोणीतरी गॉडफादार असल्याशिवाय घडू शकत नाहीत. या प्रकरणाची निपक्षपातीपणे सीबीआय किंवा न्यायालयीन चौकशी करावी. देशमुख आणि सूर्यवंशी परिवाराला प्रत्येकी एक कोटीची मदत द्यावी. त्यांच्या घरातील एका सदस्याला सरकारी नोकरी द्यावी. परभणीतील संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा,अशी मागणी त्यांनी केली. परभणी घटनेतील पोलीस कर्मचारी घोरबांड यांच्या कारकिर्दीत दलित तरुनांच्या अनेक ठिकाणी हत्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.तसेच आगामी मुंबई महानगरपालिकेत भाजप सोडून इतर समविचारी पक्षासोबत राहून रिपब्लिकन सेना लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. देशात मनुवाद पोसण्याचे काम ओबीसी कडून मोठ्या प्रमाणात होते.ज्या दिवशी तो जागा होईल तेव्हा देशातला मनुवाद उध्वस्त होईल. विज्ञान तंत्रज्ञानामुळे जग खूप जवळ आले आहे. त्यामुळे बहुजनांची दिशाभूल जास्त काळ चालणार नाही,असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत बाबासाहेबांचा आवमान केला. परंतु आंबेडकर ही फॅशन नव्हे पॅशन आहे. देशातला बहुसंख्य समाजाचा बाबासाहेब प्रेरणास्त्रोत आहेत, असे सांगून दि.13 जानेवारी रोजी संतोष देशमुख कुटुंबाची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेला रिपब्लिकन सेनेचे प्रदेश महासचिव प्रा.युवराज धसवाडीकर,जिल्हाध्यक्ष राम कोरडे, राष्ट्रीय महासचिव संजीव बोधनकर, प्रदेश संघटक यशवंतभय्या भालेराव,प्रदेश प्रवक्ते वसंत कांबळे, प्रदेश सदस्य सिध्दार्थ कांबळे,विधी जिल्हाध्यक्ष राहुल कांबळे,पांडुरंग वाघमारे, सुशील चिकटे, पप्पू कांबळे आदिंसह इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.