मराठी साहित्य निर्मितीतून आदर्श समाज घडावा – सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांचे प्रतिपादन
अहमदपुरात तिसरे एकदिवसीय ‘जागल ‘ साहित्य संमेलनाचे सूप वाजले
अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय संस्कृतीमध्ये मराठी साहित्याला अनन्य साधारण असे महत्त्व असून मराठी साहित्यामुळे जीवन जगण्याला प्रेरणा, आधार आणि दिशा मिळते त्यामुळे सर्वांनी मराठी साहित्याचा आस्वाद घेऊन मराठी साहित्यातून वा चळवळीतून आदर्श समाज उभा घडावा यासाठी असे आग्रही प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांनी केले.
ना . बाबासाहेब पाटील हे मराठवाडा साहित्य परिषद शाखा अहमदपूर यांच्या वतीने आयोजित तिसरे जागल मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.
'जागल साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक तथा सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. धोंडीराम वाडकर, व्यासपीठावर मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॉक्टर दादा गोरे, कोषाध्यक्ष रामचंद्र काळुंखे, सहकार्यवाह डॉ .गणेश मोहिते, मसाप शाखेचे अध्यक्ष सत्यनारायणभाऊ काळे, उपाध्यक्ष उदयकुमार जोशी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना ते म्हणाले की साहित्यातून शेती, आरोग्य, कला, क्रीडा क्षेत्रात मोठे बदल करून ग्रामीण भागात सहकार चळवळ अग्र क्रमाने राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.
कौतिकराव ठाले पाटील म्हणाले की, मराठीला खूप जुनी परंपरा असल्याचे सांगून मराठी भाषा ग्रामीण आणि शहरी भागात रुजवायची असेल तर प्रामाणिकपणे मराठी भाषेचा चिकित्सकपणे अभ्यास करावा असे जाहीर आवाहन केले.
यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. धोंडीराम वाडकर म्हणाले की, माणूस प्रतिकूल परिस्थितीत असला तरी शिक्षणात जिद्द, चिकाटी आणि परिश्रम ठेवून अभ्यास केल्यास सर्वसामान्य माणूस असामान्य होतो,असे सांगून विविध साहित्याचा अहवाल त्यांनी सादर केला. ग्रामीण संस्कृती आणि परंपरा जीवंत ठेवण्यासाठी लोक साहित्याचा अभ्यास करावा असे सांगितले.
यावेळी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात ना. बाबासाहेब पाटील यांचा कॅबिनेट दर्जाचा सहकार मंत्री म्हणून समावेश झाल्याबद्दल मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान ना. बाबासाहेब पाटील सत्यनारायणभाऊ काळे यांच्या हस्ते ग्रंथ सन्मानपत्र पुष्पहार देऊन करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष सत्यनारायण काळे परिचय प्रा.द.मा. माने यांनी केला तर सूत्रसंचालन राम तत्तापुरे आणि सौ. आशा तत्तापुरे-रोडगे यांनी केले.आभार उदय जोशी यांनी मानले.
कार्यक्रमाचा शुभारंभ वृक्षाला पाणी देऊन स्वराज्य जननी राष्ट्रमाता जिजामाता भोसले आणि युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठवाडा साहित्य परिषदेचे मोहिब कादरी, प्रा. गुरुनाथ चवळे, गंगाधर याचवाड, अनिल फुलारी,शेख जिलानी, प्रा. यादव सूर्यवंशी यांच्यासह इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.