उदगीरात प्रथमच मोफत तिरळेपणा निदान उपचार व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन, लॉयन्स क्लबचा पुढाकार : गरजूंनी लाभ घ्यावा : डॉ. लखोटीया
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील उदयगिरी लॉयन्स नेत्र रूग्णालय व पुणे नेत्र सेवा प्रतिष्ठानच्या वतीने उदगीर येथे दि. 24 जानेवारी ते 26 जानेवारी दरम्यान मोफत तिरळेपणा निदान, उपचार व शस्त्रक्रिया शिबीराचे आायोजन करण्यात आले आहे. या शिबीराचा उदगीर परिसरातील गरजूंनी लाभ घ्यावा. असे आवाहन उदयगिरी लॉयन्स नेत्र रूग्णालयाचे अध्यक्ष डॉ.रामप्रसाद लखोटीया यांनी केले आहे.
उदगीर शहर व परिसरात डोळ्यामध्ये तिरळेपणा असलेले रूग्ण काही प्रमाणात आढळून येतात. अशा तिरळेपणामुळे रुग्णांमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण होतो. हा न्यूनगंड दूर व्हावा, व अशा रूग्णांची सोय व्हावी. या हेतूने उदगीर शहरात प्रथमच उदयगिरी लॉयन्स नेत्र रूग्णालय, पुणे नेत्र सेवा प्रतिष्ठान पुणे व आरोग्य विभाग लातूर, लॉयन्स क्लब उदगीर व लॉयन्स क्लब उदगीर उमंग, जिल्हा अंधत्व निवारण समिती लातूर अशा विविध संस्थाच्या सहयोगातून मोफत तिरळेपणा निदान, उपचार व शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले आहे. दि. 24, 25 व 26 जानेवारी 2025 रोजी उदयगिरी लॉयन्स नेत्र रूग्णालयात हे शिबीर पार पडणार असून शुक्रवार दि. 24 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 ते 5 या वेळेत तिरळेपणा पुर्व शस्त्रक्रिया निवड तपासणी शिबीर पार पडणार आहे. तर शनिवार दि. 25 व रविवार दि. 26 जानेवारी 2025 रोजी तिरळेपणावरील रूग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या शिबीरासाठी पुणे नेत्र सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मधुसुदन झंवर, प्रकल्प प्रमुख डॉ. राजेश पवार, ऑक्युप्लास्टी सर्जन डॉ. रमेश भांगे, नेत्रतज्ञ डॉ. शाम कुलकर्णी, प्रमुख संयोजक डॉ. वैभव वनारसे यांच्यासह तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली जाणार आहे. या शिबिरास आरोग्य उपसंचालिका डॉ. अर्चना भोसले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एम. शिंदे, जिल्हा अंधत्व निवारण समितीचे सचिव डॉ. श्रीधर पाठक व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे डॉ. अमोल झेंडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
पुणे येथील नामवंत नेत्रतज्ञ डॉ. मधुसूदन झंवर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणारे हे महाराष्ट्रातील 192 वे शिबीर असून या शिबीरात तपासणी करण्यासाठी पुर्व नोंदणी करणे आवश्यक असल्याचे संयोजकांकडून कळविण्यात आले आहे. या शिबीरात नाव नोंदणीसाठी डॉ. सुरज लवटे (8485052595), डॉ. स्नेहा केंद्रे ( 7020008299), डॉ. उमेश वर्मा (9696741855) व डॉ. सागर समगे (9971162286) या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहनही संयोजकांनी केले आहे. शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या मुख्याध्यापकाचे पत्र व वैद्यकीय कागदपत्रे असतील तर सोबत घेवून यावे. असे आवाहनही करण्यात आले आहे. या शिबीरात आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील नागरिक तसेच विद्यार्थी व उपवर मुला-मुलींना प्राधान्य देण्यात येणार आहे. तपासणीअंती पात्र झालेल्या रूग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. गरजू रूग्ण व नातेवाईकांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन उदयगिरी लॉयन्स नेत्र रूग्णालयाचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया, सचिव प्रदीप बेद्रे, सहसचिव महेश बसपूरे, कोषाध्यक्ष अजय मलगे व प्रकल्प प्रमुख ईश्वरप्रसाद बाहेती, प्रमुख नेत्रतज्ञ डॉ. सुदाम बिरादार यांच्यासह उदयगिरी लॉयन्स नेत्र रूग्णालयाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.